सरकारी डॉक्टरांच्या बदल्यांत घोळ; खोटी माहिती भरूनही उपसंचालकांकडून ग्रीन सिग्नल?
By सोमनाथ खताळ | Published: May 26, 2023 03:53 PM2023-05-26T15:53:04+5:302023-05-26T15:53:40+5:30
जर याची वेळीच दखल घेऊन दुरूस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
बीड : राज्यातील सरकारी डॉक्टरांच्या बदल्या पहिल्यांदाच ऑनलाईन होत आहेत. परंतू यात अनेक डॉक्टरांनी खोटी माहिती भरल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे असे असतानाही कसलीही खात्री न करता उपसंचालकांकडूनही त्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. यामुळे या बदल्यांमध्ये ऑनलाईन घोळ झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी उपसंचालक व संचालक कार्यालयातून आर्थिक उलाढाल झाल्याचीही माहिती आहे.
राज्यातील वैद्यकीय अधिकारी (गट अ वर्ग २) या पदाच्या डॉक्टरांच्या ऑनलाईन बदल्या पहिल्यांदाच होत आहेत. यासाठी खासगीतून होणारा खर्च टळल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतू आरोग्य विभागाने आक्षेप नोंदविल्यानंतर २६ मे रोजी अंतीम यादी प्रकाशित करण्यात आली. परंतू यात अनेकांनी खोटी माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील खालापुरी आरोग्य केंद्रात सध्या एकमेव डॉ. संजीवणी गव्हाणे या नियमित वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतू याच संस्थेत मागील ११ वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ऑनलाईन अर्जात टाकली आहे. विशेष म्हणजे, यावर कसलाही आक्षेप न नोंदविता लातूर उपसंचालक कार्यालयातून ती पुढे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे उपसंचालक कार्यालयातील कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. असेच प्रकार इतरांनीही केल्याचा आरोप होत असून याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे.
बीडमधील डॉक्टर आक्रमक
ज्यांना हा प्रकार समजला त्यांनी याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाला धारेवर धरले. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन तक्रारी करण्याचाही निर्णय घेतला आहे. जर याची वेळीच दखल घेऊन दुरूस्ती झाली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही बीडच्या डॉक्टरांनी दिला आहे. जर असे झाले तर या बदल्यांना पुन्हा स्थगिती येऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
कोण काय म्हणतंय...
खालापुरी आरोग्य केंद्रात डॉ.संजिवणी गव्हाणे यांच्याशिवाय एकही महिला अधिकारी कार्यरत नाहीत, असे शिरूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते म्हणाले, संबंधित महिला डॉक्टर बीडच्या अस्थापनेवर नाहीत. तर लातूरचे उपसंचाक डॉ.प्रदीप ढेले म्हणाले, आणखी प्रक्रिया सुरूच आहे. जिल्हास्तरावील अस्थापनेला बोलावून त्या अंतीम केल्या जातील. जर असे कोणी खोटी माहिती भरून दिशाभूल केली असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे सांगितले.
चुकीचे समर्थन नाही
खोटी माहिती भरून प्रशासनाची दिशाभूल करणे चुक आहे. चुकीचे समर्थन आम्ही करणार नाहीत, परंतू असेच प्रकार जिल्ह्यात अथवा राज्यात इतर ठिकाणी झाले आहेत का? याचीही प्रशासनाने तपासणी करावी. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, एवढीच मागणी आहे.
- डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष, मॅग्मो बीड