शाळा बंद, मुले रमली गोट्यांच्या खेळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:06+5:302021-03-20T04:32:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : कोरोनाने शाळेच्या आनंदावर विरजण टाकल्याने मुलं आता पारंपरिक खेळात रममाण होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : कोरोनाने शाळेच्या आनंदावर विरजण टाकल्याने मुलं आता पारंपरिक खेळात रममाण होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
पारंपरिक खेळाचे नाव बदलले असले तरी स्वरूप मात्र तेच आहे. आताचा कब्बडी पूर्वी हु तू तू नावाने ओळखला जायचा असेच नाना प्रकारचे खेळ त्यात सुरपारंब्या, खो-खो, हमामा, पिंगा, झिंबा, महिलांसाठी फेर धरणे, शिवनापाणी, धप्पारप्पी असे खेळ ग्रामीण भागात खेळले जायचे. विनासायास त्यातून सुदृढ पिळदार शरीर तयार व्हायचे. भूकवाढ होऊन अन्नपचन क्षमता मजबूत होत असे. पूर्वी दगडाच्या गोट्या घडवून त्या खेळल्या जायच्या. पुढे काचेच्या गोट्या मैदानात आल्या. गोट्या जिंकण्याचा आणि दुसऱ्याला मोकळे केल्यानंतरचा आनंद मोठा असायचा. शहरी भागात नसले तरी ग्रामीण भागात मात्र अजूनही हे खेळ अस्तित्व टिकवून आहेत. धप्पारप्पीच्या खेळात चिंध्याचा चेंडू असायचा आणि त्याचा मारा केला जायचा, हा आनंददेखील विलक्षण होता. सध्या शाळा बंद असल्याने ग्रामीण भागात मातीतील, झाडावरील, पाण्यातील खेळ सुरू झाल्याचे दृष्य दिसून येते.
===Photopath===
180321\064918bed_8_18032021_14.jpg