शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:37 AM2021-08-24T04:37:27+5:302021-08-24T04:37:27+5:30
दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले ...
दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला
दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा वाढत चालल्याने पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गेल्यावर्षी पहिले ते चौथीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंदच राहिले. चौथी ते बारावीच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. यावर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मुले घरातच असल्याने मोबाईल व टीव्हीचे मोठे व्यसन त्यांना जडत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास नसणे, नैराश्य, चिडचिडेपणा वाढीस लागला आहे. एकलकोंडेपणा, हट्टीपणा, कशातच मन न लागणे. अशा विविध समस्या मुलांमध्ये जाणवत आहेत. परिणामी या सर्व स्थितीमुळे पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.
मुलांच्या समस्या
शाळा बंद असल्याने मुलांना मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळता येत नाही. त्यामुळे खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होत चालली आहेत. मुलांमधील ऊर्जेला सद्यस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. मुले जास्त हट्टी होत आहेत. मोबाईल, संगणक, टॅबच्या आहारी गेली आहेत.
पालकांच्या समस्या
शाळा बंद असल्याने पालकांना मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत आहे. यातूनच नैराश्य, चिडचिडेपणाही वाढत असल्याचे समोर येत आहे. मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याचे पाहून, पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
मुलांमधील चिडचिड वाढली आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहेत. मुले एकलकोंडी होत आहेत. सकारात्मक चर्चा हवी, ती होत नाही. तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद गांभीर्याने होत नाहीत.
:डॉ. राजेश इंगोले,
मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई
मुलांमध्ये मन न लागणे आदी समस्या जाणवत आहेत. पालकांचेही मानसिक आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. आळशीपणा वाढत आहे. बुद्धिमत्तेची चंचलता कमी होणे, द्विधा स्थिती निर्माण होत आहे. कमजोरी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात.
-डॉ. शिवराज पेस्टे,
मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई.
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली - ४४,८७७
दुसरी - ५०,७९०
तिसरी- ५३,२९७
चौथी-- ४८,८९५
पाचवी- ५२,८३३
सहावी- ५२,८९७
सातवी- ५२,०१४
आठवी- ५१,८०२
नववी- ४९,८९३
दहावी- ४८,९८३
----------
शाळेच्या निर्णयाकडे लक्ष
शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील काही शाळा सुरूही झाल्या आहेत. मात्र, नगर परिषदेच्या हद्दीतील शाळा बंदच आहेत. त्या कधी सुरु होतील? याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.