सततच्या छेडछाडीमुळे शाळकरी मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:20 PM2019-07-31T13:20:27+5:302019-07-31T13:21:57+5:30
गेल्या दीड महिन्यापासून शाळेत जाताना आणि येताना रस्त्यात छेडछाड
विडा (ता. केज, जि. बीड): छेडछाडीला कंटाळून विषारी द्रव प्राशन केलेल्या स्वाती बाळासाहेब घोळवे या शाळकरी मुलीचा उपचारादरम्यान सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. केज तालुक्यातील विड्यापासून जवळ असलेल्या गप्पेवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी अशोक रामदास केदार या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे.
केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील स्वाती बाळासाहेब घोळवे ही गेल्या अनेक वर्षांपासून गप्पेवाडी येथे तिचे मामा हनुमंत आश्रुबा केदार यांच्याकडे राहत होती. सध्या ती शिंदी येथील बुवासाहेब पाटील विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होती. गेल्या दीड महिन्यापासून शाळेत जाताना आणि येताना रस्त्यात अशोक केदार नामक युवक तिला छेडत होता.
गुरुवारी २५ जुलै सकाळी स्वाती गप्पेवाडी येथून पायी तीन किलोमीटर शाळेसाठी निघाली होती. रस्त्यात अशोक केदार याने दुचाकी आडवी लावून अश्लील भाषा वापरत तिला शिव्या दिल्या. त्यामुळे भेदरलेल्या स्वातीने घरी आल्यानंतर शेतातील कापसावर फवारण्यासाठी आणलेले विषारी द्रव प्राशन केले. ही बाब समजल्यानंतर तिला तात्काळ अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पाच दिवसांनंतर मंगळवारी तिची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी आरोपी अशोक केदार याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. तपास एपीआय मुंडे व विडा बीट जमादार बाळकृष्ण मुंडे, राम चेले व मुकुंद ढाकणे हे करीत आहेत.
आरोपीच्या वडिलांनी दिली होती धमकी
अशोक केदार हा स्वातीला छेडत असल्याची बाब स्वातीने तिच्या मामाला सांगितली. त्यावर एक महिन्यांपूर्वी मामासोबत श्रीमंत केदार, बाबासाहेब केदार, दत्तात्रय केदार यांनी अशोकचे वडील रामदास यांना भेटून ही बाब सांगितली. यावर अशोकच्या वडिलांनी काय करायचे ते करा, मीच पोलीस ठाण्यात तक्रार देईन असे स्वातीच्या मामाला धमाकवले होते.