अनलॉकमध्येही शाळा राहणार ‘लॉक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:18+5:302021-06-16T04:44:18+5:30
बीड : कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत आल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोना परिस्थितीच्याबाबतीत बीड जिल्हा तिसऱ्या ...
बीड : कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत आल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोना परिस्थितीच्याबाबतीत बीड जिल्हा तिसऱ्या स्तरात असल्याने शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध शिथिल करण्यात आले. १४ जूनपर्यंत शाळा भरविण्याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे सर्व काही अनलॉक होत असताना मात्र शाळांना ‘लॉक’राहणार आहे. विद्यार्थी येणार नसले, तरी गुरुजींची शाळा मात्र भरणार आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सर्वच पातळीवर दक्षता घेण्यात आली. त्यामुळे मागीलवर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. जूनमध्ये शैक्षणिक सत्र सुरू झाले, तरी शाळा भरल्या नव्हत्या. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने ऑक्टोबरपर्यंत शाळा भरल्या नाहीत, तर शासन निर्देशानुसार शिक्षकांना शाळेत उपस्थितीबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचे प्रयत्न झाले. मुलांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आला. त्याचे काही प्रमाणात फलित झाले, मात्र ऑनलाईन प्रणाली विविध कारणांमुळे प्रभावी पर्याय ठरू शकली नाही. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू झाल्या; मात्र पालकांनी दक्षता म्हणून पाल्यांना पाठविले नाही. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती अल्प होती, तर जानेवारीत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. मात्र काही दिवसांतच ते बंद करावे लागले. परीक्षा प्रक्रिया न होता, सर्व विद्यार्थी वर्गोन्नत झाले. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे शासन निर्देश होते. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शाळा सुरू होतील, असे वाटत असताना सर्वकाही अनलॉक, परंतु शाळांना कुलूपच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
--------------
१५ जूनपासून शिक्षकांना पूर्वतयारीसाठी शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार ‘सुंदर माझी शाळा’ अंतर्गत रंगरंगोटी, बाला संकल्पना कार्यान्वित करणे, अभिलेखे अद्ययावत करणे, स्वच्छता, शैक्षणिक साहित्य निर्मिती आदी शाळा पूर्वतयारीची कामे शिक्षक, मुख्याध्यापक करणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही होईल. - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), जि. प. बीड.
----------
शाळा सुरू करायची म्हटली तरी...
शाळांचे वर्ग भरणार नसले तरी गुरुजींना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वर्ग, शाळा परिसराची तसेच प्रसाधनगृहांची स्वच्छता, १५ महिन्यांपासून शाळा बंद राहिल्याने निर्जंतुकीकरण, किरकोळ स्वरूपाची डागडुजी, झाडांची निगा, पाण्याची व्यवस्था आदी पूर्वतयारी करावी लागेल. यासाठी गरजेनुसार सादिलमधून खर्च करण्याची तरतूद आहे. किरकोळ कामांसाठी २ ते ५ हजारांपर्यंत खर्च होऊ शकतो. पाच दिवसात ही कामे होऊ शकतात.
-------
गुरुजींची शाळा सुरू होणार
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नियोजन, ऑनलाईन शिक्षण, माझी शाळा, सुंदर शाळा आदी शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक (मा.) व श्रीकांत कुलकर्णी (प्रा.) यांनी सूचित केले आहे.
-----
बीड जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी
पहिली ते बारावी - ५, ८६, ४५३