शाळा बंद आहेत, आम्ही अभ्यास कशाचा करायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:50+5:302021-08-29T04:31:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पहिली ते सातवीच्या वर्गासह प्राथमिक शाळा बंदच आहेत. यावर्षीसुद्धा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पहिली ते सातवीच्या वर्गासह प्राथमिक शाळा बंदच आहेत. यावर्षीसुद्धा शाळेचे सत्र सुरू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास नसल्याने फक्त त्यांच्यासमोर मोबाइल, खेळ आणि खेळच आहे. त्यांची पूर्णत: अभ्यासाची सवय बंद झाली आहे. त्यांना अभ्यास कर म्हटले तर तेच उलट पालकांना म्हणतात, शाळाच बंद आहेत. अभ्यास कशाचा करायचा? यामुळे पालक चिंतेत आहेत.
कोरोना महामारीचा शिरकाव होण्यापूर्वी सर्व शाळा नियमित सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर शाळेत व्यस्त राहत असत. घरी आल्यानंतर शाळेतून मिळालेले होमवर्क करण्यात व्यस्त राहत होती. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्राथमिक शिक्षणाचे वर्ग बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची दिनचर्याच बदलली आहे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ निव्वळ खेळण्यात जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शाळेत दाखल झालेली लहान मुले जीवनातील महत्त्वाच्या पायाभूत शिक्षणात मिळणारी अक्षर ओळख आणि इंग्रजी वर्णाक्षरे विसरली आहेत. आरोग्य तज्ज्ञांकडून पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे शासन शाळा सुरू करण्याच्या निर्णयात वेळोवेळी बदल करीत आहे. यावर्षी तर शाळेचे सत्र सुरू झाले नाही. शाळा बंदच राहील की काय? असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकून आहे.
.....
शैक्षणिक घडी विस्कटली
प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु ते प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. पाल्य पालकांचे ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या भविष्याची पालकांना काळजी वाटू लागली आहे. एकंदरीत कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी विस्कटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.