UPSC परीक्षेवर बळीराजाच्या कन्येची मोहर; घरीच अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 03:56 PM2022-02-12T15:56:21+5:302022-02-12T16:02:48+5:30
भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात ३६ व्या क्रमांक
बीड : अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कन्येने हुशारीची चुणूक दाखवत पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण असलेल्या युपीएससी ( UPSC ) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे असे या शेतकरी कन्येचे नाव आहे. भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ( IES ) राज्यात प्रथम तर देशात ३६ व्या क्रमांक श्रद्धाने पटकावला आहे. श्रद्धाचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर निरक्षर आई शेतीत मदत करते.
बीड जिल्ह्याची ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. मात्र, जिल्ह्याची शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला क्षेत्रात देखील वेगळी छाप आहे. जिल्ह्यातील लोणी शहाजानपूर येथील नवनाथ शिंदे यांच्या श्रद्धा या मुलीने अभियांत्रिकी सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने जिल्हावासीयांचा उर अभिमानाने भरून आला आहे. श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडमध्येच झाले. तर औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पदवी मिळताच २०१८ साली तिने थेट दिल्ली गाठत अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी सात महिने खाजगी शिकवणी लावली. त्यानंतर जानेवारी-२०२० मध्ये झालेल्या युपीएससीची अभियांत्रिकी सेवेची परीक्षा दिली. या पहिल्याच प्रयत्नात तिला यश लाभले. श्रद्धाने राज्यात पहिला तर देशात ३६ वा क्रमांक मिळविला आहे. श्रद्धाने या यशाचे श्रेय आई - वडीलांसह गुरुजनांना दिले आहे.
मुलीच्या यशामुळे सर्वात आनंदी
मुलीमुळे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण लाभले, अशा भावना श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. मी शेती करतो. श्रद्धाला शिक्षणाची आवड होती. तिच्यात जिद्द आहे. यामुळे तिच्या शिक्षणासाठी मी काहीच कमी पडू दिले नाही. लग्नाचे वय होताच मुलीचे लग्न लावून टाका, असे इतरांनी दिलेली सल्ले न ऐकता श्रद्धाला उच्चशिक्षण दिले. तिच्या यशामुळे आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण लाभला आहे, असेही शिंदे म्हणाले. तर तिने आमचं नाव खूप मोठं केलं असून मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय, अशा भावना श्रद्धाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.