भगवानगडाचे महत्त्व कमी करण्यासाठी जन्मगावाचा काढला शोध - धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:02 AM2018-09-11T00:02:27+5:302018-09-11T00:03:02+5:30
मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करू दिली नाही म्हणून ते आता विठ्ठलाचा जन्म कुठं झाला ? याचा शोध घेत आहेत. मात्र, भगवानगडाचे महत्त्व कमी करण्यासाठी ‘काहींनी’ स्वार्थासाठी बाबांच्या जन्मगावाचा शोध काढला, अशी उपहासात्मक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली.
पाटोदा : मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पुजा करू दिली नाही म्हणून ते आता विठ्ठलाचा जन्म कुठं झाला ? याचा शोध घेत आहेत. मात्र, भगवानगडाचे महत्त्व कमी करण्यासाठी ‘काहींनी’ स्वार्थासाठी बाबांच्या जन्मगावाचा शोध काढला, अशी उपहासात्मक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली.
संत भगवान बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोमवारी येथे आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, राजेंद्र जगताप, बाळासाहेब आजबे, चंपावती पानसंबळ, रोहिदास पाटील, शिवभूषण जाधव, महेंद्र गरजे, रामकृष्ण बांगर आदी यावेळी उपस्थित होते.
ह.भ.प. रामकृष्ण रंधवे, एकबाल पेंटर, प्राचार्य दत्तात्रय आघाव, दीपक नागरगोजे, संदीप पवार, बाळासाहेब आवारे आदींचा यावेळी मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . मुंडे म्हणाले की, भगवानगडावर मी दगड झेलले, मात्र बाबांनी उभारलेल्या गडाचे महत्त्व कमी होईल, अशी पापकृती मी कधी केली नाही. असा विचार डोक्यात येणे म्हणजे बाबांविषयी प्रतारणा केल्यासारखं आहे.
‘यांना’ गडाचं राजकीय व्यासपीठ करू नका, असं विनवणी केली गेली तर यांनी बाबांचं जन्मगाव राजकीय व्यासपीठासाठी शोधलं. गड बाबांनी उभारला. गडाचं महत्त्व कमी होऊ देऊ नका. जे असं करतील ते नेस्तनाबूत होतील. पाटोदा तालुका भाग्यवंतांचा तालुका आहे. या तालुक्याने संत भगवानबाबा, संत वामनभाऊंना जन्म दिला. या संतांनी शिक्षणाची शिकवण सर्व समाजाला दिल्याचे ते म्हणाले.
उसतोड मजुरांच्या प्रश्नाला हात घालत धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मजुरांच्या प्रश्नासाठी पूर्वी तीन वर्षांनी धोरण आढावा घेण्याचं ठरलं होतं ‘यांनी’ ते पाच वर्षांवर नेऊन ठेवलं. महापुरुष, संत महंतांना जाती धर्मात वाटू नका. सर्व समाजाने येऊन एकत्रित पुण्यतिथी जन्मोत्सव साजरे करावेत, असे आवाहन मुंडे यांनी केले.