फिरत्या पथकाद्वारे कोरोना संशयित रुग्णांची शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:23+5:302021-05-29T04:25:23+5:30
कडा : आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या फिरत्या पथकाद्वारे आशा स्वयंसेविका वाडी, वस्तीवर घरोघरी भेटी देऊन कोविडची लक्षणे आढळून येणाऱ्या ...
कडा : आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या फिरत्या पथकाद्वारे आशा स्वयंसेविका वाडी, वस्तीवर घरोघरी भेटी देऊन कोविडची लक्षणे आढळून येणाऱ्या संशयित रुग्णांना शोधून आशा वर्कर कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी ठिकठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत.
आष्टी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात यावी, म्हणून त्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत फिरत्या तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली. या कामासाठी ठिकठिकाणी आशा स्वयंसेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागात वाडी, वस्तीवरच्या घरोघरी भेटी देऊन आशा स्वयंसेविका कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या संशयित रुग्णांचा शोधून त्यांची जागीच तपासणी करीत आहेत. त्याठिकाणी आढळून आलेल्या रुग्णांना तातडीने शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करीत आहेत.
आरोग्य विभागाच्या फिरत्या पथकाने बुधवारी वटणवाडी गावात सरपंच जालिंदर नरवडे यांच्या उपस्थितीत भेट देऊन तेथील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आष्टीचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल आरबे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय अधिकारी सुनील पाटील, स्वप्नील पांचाळ, आनंद कदम, आरोग्यसेवक जीवन राठोड, गटप्रवर्तक आशा धस, आशा स्वयंसेविका रोहिणी जाधव, अंगणवाडी ताई कांताबाई नाथ यांची टीम फिरत्या पथकाच्या माध्यमातून परिसरातील घरोघरी संपर्क करून कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या कोरोनाच्या आनुषंगाने सूचनाचे पालन केले जात असून नागरिकांनी आता तरी पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.
===Photopath===
280521\nitin kmble_img-20210528-wa0034_14.jpg