शोध मोहिमेत आढळली ५११ तीव्र कुपोषित बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:13+5:302021-09-10T04:41:13+5:30
बीड : मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या अंगणवाड्यांमुळे बालकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत ...
बीड : मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या अंगणवाड्यांमुळे बालकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात ५११ तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. या बालकांना शासन निर्देशानुसार उपचार आणि पोषण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्च २०२० पासून अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे बालकांची आरोग्य तपासणी झाली नव्हती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मागील महिन्यात १७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान कुपोषित बालकांची शोधमोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली.
या मोहिमेत शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे वजन आणि उंची मोजण्यात आली. यात एक लाख ६४ हजार ५३० बालके सर्वसाधारण स्थितीत असल्याचे आढळून आले. २०४४ बालके मध्यम कुपोषित असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. तर या मोहिमेत ५११ तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.
तीव्र कुपोषित बालके
तालुका - संख्या
बीड - ९२
गेवराई - ३९
केज - ५४
आष्टी - ५३
माजलगाव -४३
पाटोदा -- ६
शिरूर -- ७५
वडवणी -- २१
परळी -- १८
धारूर -- १२
अंबाजोगाई -- ८८
कशामुळे कुपोषण
० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना कोरोना काळामध्ये लॉकडाऊन तसेच पोषक आहार मिळण्यात आलेल्या अडचणी, विविध कारणांमुळे पालकांचेही दुर्लक्ष झाले. अंगणवाड्या बंद असल्याने घरपोहच आहार मिळाला; परंतु आरोग्य तपासण्या झाल्या नाहीत, त्यामुळे तीव्र कुपोषण असलेली बालके आढळली.
मागील महिन्यात १५ दिवस राबविलेल्या मोहिमेत आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांना मध्यम कुपोषित गटात आणण्यासाठी शासन निर्देशानुसार ग्राम बाल विकास केंद्र सुरू केले जाणार आहेत. तेथे पूरक पोषण आणि आरोग्य संहितेचा लाभ त्यांना देण्यात येणार आहे. - चंद्रशेखर केकाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग जि. प. बीड.
१७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान कुपोषित बालकांची शोध मोहीम राबविण्यात आली. बालकांचे वजन उंचीचे मोजमाप करण्यात आले. सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, ८७ पर्यवेक्षिका आणि सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला.
सर्वेक्षणानुसार बालके
१७६१७४
वजन-उंची मापन केलेली बालके
१६७०८५
साधारण पोषण स्थिती असलेली बालके
१६४५३०
मध्यम कुपोषित बालके
२०४४
तीव्र कुपोषित बालके
५११
---------