हंगामीची झडती झाली, शिक्षण सचिवांना देणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:29 AM2019-01-25T00:29:06+5:302019-01-25T00:30:11+5:30
हंगामी वसतिगृहांची मागील तीन दिवसांपसून राज्यस्तरीय पथकाने तपासणी पूर्ण केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण सचिवांकडे सादर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात हंगामी वसतिगृहांची मागील तीन दिवसांपसून राज्यस्तरीय पथकाने तपासणी पूर्ण केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण सचिवांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर वसतिगृह योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात येणार असून ज्या चांगल्या बाबी आहेत, त्या आणखी परिपूर्ण करण्यात येणार आहेत. राज्याचे पथक गेले असलेतरी जिल्ह्यातील पथक दरमहिन्याला अचानक पाहणी करणार असल्याचे संकेत आहे.
बीड जिल्ह्यात हंगामी वसतिगृहांच्या पाहणीसाठी राज्य स्तरीय पथक आले होते. हंगामी वसतिगृह कशा रितीने चालविले जातात. तेथील व्यवस्थापन कसे आहे. नोंदणीनुसार विद्यार्थी उपस्थिती, त्यांना मिळणारे लाभ, जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थाचा दर्जा, स्वयंपाक घर, तसेच २०१४ पासून ते २०१८ पर्यंतच्या कालावधीत योजनेची अंमलबजावणी आणि त्यासाठी आलेल्या निधीचा विनियोग कसा केला याचे लेखा व इतर बाबींची तपासणी या पथकाने केली. या चार पथकात मुंबई, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, यवतमाळ येथील अधिका-यांचा समावेश होता. शिक्षण सहसंचालक, लेखा लिपिक, कार्यक्रम अधिकारी, लेखाधिकारी दर्जाचे अधिकारी या पथकात होते.
गुरुवारी या पथकांनी परळी, अंबाजोगाई, धारूर, आष्टी, केज तालुक्यातील वसतिगृहांची तपासणी केली. आष्टी तालुक्यात दोन पथकांनी पाहणी केली. माजलगाव तालुक्यातील वसतिगृहांच्या तपासणी वेळी पथकातील अधिका-यांनी अन्न पदार्थ खाऊन दर्जा व स्वादाची चाचणी केली.
जिल्ह्यात तीन दिवसांत तपासलेल्या जवळपास ७० वसतिगृहांमध्ये अशाच प्रकारे तपासणी केली. हे पथक आता शिक्षण संचालक, शिक्षण सचिवांकडे आपला अहवाल देणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांना या तपासणीबाबत आवश्यक ती माहिती कळविण्यात येणार आहे.
तपासणीबाबत गुप्तता
हंगामी वसतिगृह तपासणीसाठी आलेल्या चार पथकांसाठी पथदर्शी म्हणून शिक्षण विभागाने समन्वयक नियुक्त केले होते.
पथक हंगामी वसतिगृहाच्या तपासणीला पोहोचताच हे समन्वयक तेथून लांब अंतरावर थांबत. तेथील मुख्याध्यापकांशी चर्चा आणि विचारणा पथकातील अधिकारी करत होते.
पथकाने काय चौकशी केली व काय आढळले याबाबत गुप्तता राखली. त्यामुळे येणा-या अहवालावरच तपासणीचा निकाल लागणार आहे.