बीड जिल्ह्यात गुन्हेगारांच्या दुसऱ्या पिढीची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:00 PM2018-10-04T16:00:20+5:302018-10-04T16:00:54+5:30
काही गुन्हेगारांचा व्यवसायच गुन्हेगारी असल्याचे समोर आले आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : काही गुन्हेगारांचा व्यवसायच गुन्हेगारी असल्याचे समोर आले आहे. गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील साहेबराव पवार, भास्कर पवार, मारूती पवार आणि गोविंद पवारनंतर आता त्यांची मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत. परंतु पोलिसांनी वेळीच सापळा लावून नितीन व विलास या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी माजलगाव तालुक्यात एकाच रात्री दोन घरफोड्या केल्या होत्या.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी, दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकामंध्ये भितीचे वातावरण आहे. माजलगाव तालुक्यातही गत महिन्यात मंजरथमध्ये दत्तात्रय नांदुरकर तर किट्टी आडगावमध्ये बालासाहेब कराडे यांचे बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांन तपासाची चक्रे गतीने फिरविली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी त्यांची टिम तपासाला लावली. महिनाभर शोध घेतल्यानंतर या चोऱ्या नितीन व विलास पवारने केल्याचे समजले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांच्याकडून ४ तोळे दोन ग्राम सोनेही वसुल केल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, वैभव कलुबर्मे, सहायक अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि मिर्झा बेग, सपोनि दिलीप तेजनकर, पोउपनि मरळ, विकास दांडे, मुंजा कुवारे, राठोड, शेख यांनी केली.
सोनपेठच्या सोनाराला दिले सोने
चोरी केल्यानंतर या दोघांनीही चोरीतील दागिने सोनपेठ येथील एका सराफाला विक्री केली होते. पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन संबंधित सोनाराकडून ४२ ग्राम सोने वसुल केले आहे.
आणखी गुन्हे उघड होणार
नितीन व विलास पवारला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४२ ग्राम सोने वसुल केले आहे. आणखी गुन्हे उघड होऊ शकतात. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. - भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक, माजलगााव