दुसरी लाट; ६६ दिवसांत ५७५ मृत्यू अन् ४८ हजार नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:22+5:302021-05-11T04:36:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात ५ मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यात आतापर्यंतच्या ६६ दिवसांत तब्बल ५७५ ...

The second wave; 575 deaths in 48 days and 48,000 new patients | दुसरी लाट; ६६ दिवसांत ५७५ मृत्यू अन् ४८ हजार नवे रूग्ण

दुसरी लाट; ६६ दिवसांत ५७५ मृत्यू अन् ४८ हजार नवे रूग्ण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात ५ मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यात आतापर्यंतच्या ६६ दिवसांत तब्बल ५७५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच ४८ हजार ६०४ नवे रूग्ण आढळले आहेत. याचवेळी दिलासादायक म्हणजे बाधितांपैकी ४१ हजार ८४५ रूग्णांनी कोरोनाला हरवले आहे. असे असले तरी दुसऱ्या लाटेतील परिस्थिती भयानक असून, सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पहिल्या लाटेत नव्या बाधितांसह मृत्यू रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले होते. परंतु, ५ मार्चपासून दुसरी लाट आली आणि सर्वत्र रूग्णसंख्येसह मृत्यूही वाढले. आजही जिल्ह्यात दररोज १,२०० ते १,५०० नवे रूग्ण आढळत आहेत तसेच मृत्यूंची संख्याही १०पेक्षा जास्त आहे. दुसरी लाट गंभीर असल्याचे समोर आल्यानंतरही लोक कोरोनाबाबत काळजी घेत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी कडक लाॅकडाऊन करण्यात आले. तरीही काही लोक बाहेर फिरतात. तसेच जे बाहेर फिरतात, ते देखील पूर्ण काळजी घेत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढत चालला असून, नवीन रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती भयानक असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ग्रामीण भागातील संसर्ग थांबेना

पहिल्या लाटेत ग्रामीण भागात अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. तसेच ज्या गावांमध्ये रूग्ण आढळले तेथील संख्याही कमीच होती. शहरांमध्ये रूग्णसंख्या अधिक होती. परंतु, दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात झपाट्याने रूग्णसंख्या वाढत आहे. प्रत्येक तालुक्यात ५०पेक्षा जास्त रूग्ण असलेली गावे आहेत. शहरांमध्ये मात्र ग्रामीणच्या तुलनेत कमी रूग्णसंख्या असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

चाचण्या वाढल्याने रूग्ण निष्पन्न

पहिल्या लाटेत २ लाख १८ हजार ३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात १९ हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. तर दुसऱ्या लाटेत केवळ दोन महिन्यात आतापर्यंत २ लाख १५ हजार चाचण्या झाल्या असून, ४८ हजार ६०४ नवे रूग्ण आढळले आहेत.

रिकव्हरी रेटही घसरला

पहिल्या लाटेत १८ हजार १४२ रूग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्याचा टक्का ९४ होता. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ४१ हजार ८४५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, याचा टक्का ८८ एवढा आहे. यावरून ६ टक्क्याने कोरोनामुक्तीचा दर घटल्याचे दिसत आहे.

स्मशानातील सरणच विझेना

मागील महिनाभरापासून जिल्ह्यात जवळपास ४०० कोरोनाबळी गेले आहेत. या सर्वांवर बीड व अंबाजोगाईत स्वतंत्र स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. महिनाभरापासून सरासरीनुसार प्रत्येक दोन तासाला एक सरण पेटत आहे. एक सरण विझेपर्यंत दुसरे सरण पेटत असल्याचे वास्तव स्मशानात पाहायला मिळत आहे.

कोट

दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्या वाढली आहे तसेच मृत्यूही हाेत आहेत. याबाबत नियोजन आणि उपाययोजना केल्या जात असल्या, तरी अद्याप आम्हाला त्यात पूर्णपणे यश आलेले नाही, हे खरे आहे. कोरोनाची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करतच आहोत, परंतु नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. ही महामारी आटोक्यात यावी, हीच अपेक्षा आहे.

डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

-----

अशी आहे आकडेवारी

पहिली लाटदुसरी लाट

चाचण्या २१८०३१ २१५१२७

पाझिटिव्ह १९११६ ४८६०४

कोरोनामुक्त १८१४२ ४१८४५

मृत्यू ५८५ ५७५

आरोग्य संस्था९ १५४

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार दुसरी लाट ५ मार्च २०२१पासून सुरू झालेली आहे.

Web Title: The second wave; 575 deaths in 48 days and 48,000 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.