दुसऱ्या वर्षीही गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला भाविक मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:28+5:302021-06-16T04:45:28+5:30
अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या ...
अविनाश मुडेगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनाला भक्त मुकणार आहेत. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या सात वर्षांपासून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्व रिंगण सोहळा ही गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे.
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे दैवत असलेल्या शेगावचे संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पायी पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जात असतो. गण गणात बोते, विठुनामाचा गजर करीत पालखी पंढरपूरच्या दिशेने जून महिन्यात मार्गस्थ होत असते. ही पालखी जून महिन्यात असलेल्या एकादशीला दरवर्षी अंबाजोगाईला येते. कोरोनामुळे मार्च २०२० पासून मोठ्या कार्यक्रम सोहळ्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही श्रींचा पालखी सोहळा पूर्वीप्रमाणे काढण्यात आला नाही. यावर्षी राज्य शासनाने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत एस.टी. बसमधून पालख्या नेण्यास राज्यातील केवळ १० देवस्थानच्या आषाढीवारीला परवानगी दिली आहे. यामध्ये शेगावचा संत गजानन महाराज संस्थानचा समावेश नाही. आषाढीवारीला जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा अंबाजोगाई येथे एक दिवसीय मुक्काम असतो. श्रींचा पालखी सोहळा पाहण्यासाठी, दर्शनासाठी तथा स्वागतासाठी अंबाजोगाई परिसरातील हजारो भक्तगण आतुर असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून भाविक या आनंदाला मुकले आहेत.
अंबाजोगाई शहरातून आषाढी एकादशीला जाणाऱ्या शेकडो दिंड्या अंबाजोगाई मार्गेच जातात. शहरात छोट्या मोठ्या दिंड्यांची व्यवस्था पिढ्या न पिढ्या अनेक कुटुंबांकडे आहे. या दिंड्यांचा पाहुणचार मोठ्या उत्साहाने होतो. अंबाजोगाई शहरात गेल्या सात वर्षांपासून योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर अश्व रिंगण सोहळा उत्साहात साजरा होतो.
.....
अटी, शर्तीवर परवानगी द्या
सलग दुसऱ्यावर्षी श्रींच्या पालखी दर्शनाला मुकावे लागत आहे. हळूहळू सर्वत्र अनलॉक होत असताना सरकारने काही अटी, शर्तीवर आषाढीवारीच्या पालखी सोहळ्यास परवानगी द्यायला हवी होती, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. श्रींचा पालखीचा प्रत्येकी गावी एका रात्रीचा मुक्काम असतो. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण असते. हा पालखी सोहळा भाविकांना वर्षभराची ऊर्जा देऊन जातो.
-अंबादास महाराज चिक्षे.