'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय
By सोमनाथ खताळ | Updated: June 22, 2024 21:10 IST2024-06-22T21:05:09+5:302024-06-22T21:10:07+5:30
'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी'; एक हजार दिंड्या, बारा लाख वारकरी; पाच किमीवर आपला दवाखाना

'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय
बीड : 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचे हे दुसरे वर्षे आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या राज्यातील एक हजार दिंड्यांमधील १२ लाख ४१ हजार वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक पाच किलो मीटर अंतरावर एक हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तयार केला आहे. ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी हे वारकऱ्यांच्या सेवेत राहणार असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी 'लोकमत'ला दिली.
आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या काेणाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेत असतात. काही जण दिंड्यांमध्ये सहभागी होतात. यावेळीही आतापर्यंत शेगावची श्री संत गजानन महाराज, अमरावतीची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जळगावची श्री संत मुक्ताबाई आणि नाशिकची श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत. यासह राज्यातील इतरही मोठ्या असणाऱ्या दिंड्या २६ जूनपासून मार्गस्थ होणार आहेत. यातील वारकऱ्यांना आरोग्याची समस्या उद्भवली तरी तातडीने सेवा देता यावी, यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण नियोजन केले आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून दोन दिवसांत पंढरपूर येथे बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.
पालखी मुक्कामी आयसीयू
ज्या ठिकाणी पालखी किंवा दिंडी मुक्कामी राहणार आहे, अशा ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते आयसीयू तयार केले जाणार आहे. येथे ऑक्सिजन, मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर असतील.
चार ठिकाणी महा आरोग्य शिबिर
पंढरपूरमध्ये गेल्यावर महाआरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. येथे विशेष तज्ज्ञांसह ३ हजार ३६२ डॉक्टर, कर्मचारी सेवा देणार आहेत. २०२३ मध्ये वारकऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी करून ७७ हजार ८५४ रूग्णांना चष्म्याचे मोफत वाटप केेले होते. सोबत इतरही सेवा दिल्या होत्या.
बीडच्या भूमिपुत्राला मान
बीडचे भूमिपुत्र असलेले डॉ. राधाकिशन पवार हे सध्या राज्याचे सहसंचालक आहेत. त्यांनाच या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचे नोडल अधिकारी केलेे आहे. सलग दुसऱ्या वर्षी डॉ. पवार यांच्या रूपाने बीडला मान मिळाला आहे. कोरोनाकाळात त्यांनी बीडला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सेवा दिलेली आहे.
"आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' या उपक्रमाचे सलग दुसरे वर्षे आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सहा हजार डॉक्टर, कर्मचारी असणार आहेत. तसेच पालखी मुक्कामी तात्पुरते ५ बेडचे आयसीयू, रूग्णवाहिका आदी सुविधा असतील. शेवटी महाआरोग्य शिबिर होईल. आमच्यासाठी वारकरी हाच पांडुरंग आहे. त्यांच्या सेवेत आम्ही कोठेही कमी पडणार नाहीत, असा विश्वास आहे," असे आरोग्य सेवा पुण्याचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.
रूग्णवाहिका ७०७
आपला दवाखाना २५८
आरोग्य अधिकारी, कर्मचारी ६३३८
प्रत्येक दिंडीसोबत पथके ४
बाईक रूग्णवाहिका २१२
दिंडीप्रमुखांना औषधी कीट वाटप ५८८५
हिरकणी कक्ष १३६
महिलांसाठी स्त्री रोगतज्ज्ञ १३६
तात्पुरते आयसीयू ८७
पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण ५०७१
खासगी रुग्णालयात खाटा आरक्षित १०
चित्ररथ ९