इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी २०१२ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:04+5:302021-04-17T04:33:04+5:30

बीड : बालकांच्या मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ७ एप्रिल रोजी झालेल्या सोडतीनुसार इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील २०१२ ...

Selection of 2012 students for free admission in English school | इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी २०१२ विद्यार्थ्यांची निवड

इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी २०१२ विद्यार्थ्यांची निवड

googlenewsNext

बीड : बालकांच्या मोफत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ७ एप्रिल रोजी झालेल्या सोडतीनुसार इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील २०१२ विद्यार्थ्यांची निवड झाली. ज्यांची निवड झाली, त्यांच्या प्रवेश निश्चिती बाबत संबंधित पालकांना एनआयसीद्वारे १५ एप्रिलपासून संदेश मिळणे सुरू झाले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के प्रवेशासाठी जिल्ह्यातील २३३ शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या शाळांमध्ये २५ टक्के ऑनलाईन प्रवेश क्षमतेनुसार २,२२१ जागांची क्षमता निश्चित केली होती.

यासाठी जिल्ह्यातून ३,९४३ पालकांनी त्यांच्या पाल्यांचे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दाखल केले होते. संबंधित पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत प्रतीक्षेत होते. सात एप्रिल रोजी सोडत झाल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चिती बाबत पालकांना भ्रमणध्वनीद्वारे एनआयसी (पुणे) मार्फत संदेश पाठविण्यात आलेले आहेत. ज्या पाल्यांची निवड झालेली नाही, त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत आरटीई ऑनलाईन प्रणालीवर जाऊन खात्री करून घ्यावी. या प्रणालीकडून येणाऱ्या संदेशावर अवलंबून न राहता पालकांनी प्रत्यक्ष ऑनलाईनद्वारे खात्री करून घेण्याबाबत शिक्षण विभागाने कळविले आहे.

...तर प्रवेश समिती जबाबदार

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे. प्रवेश समितीने ऑनलाईन प्रणालीवर अर्ज भरताना पालकांनी ज्या कागदपत्रांची नोंद केली आहे. त्याबाबत प्रत्यक्ष पुराव्यानिशी खात्री करून ऑनलाईन प्रवेश करून घेण्याची कार्यवाही करावी. याकामी काही अनियमितता झाल्यास पडताळणी समितीला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.

पाल्यांचे प्रवेश निश्चित करावेत

पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे व पुरावे गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील प्रवेश पडताळणी समितीकडे विहित मुदतीत सादर करून आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व शिक्षणाधिकारी अजय बहीर यांनी केले आहे.

असा पाहा प्रवेश दिनांक

ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, त्यांच्या पालकांनी आरटीई पोर्टलवर प्रवेश तारखेच्या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून आपल्या अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक पाहावा. प्रवेश घेण्याची तारीख पोर्टलवर दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. जाताना आपल्या पाल्याला बरोबर घेऊन जाऊ नये. तसेच दिलेल्या मुदतीतच प्रवेश घ्यावा, असे आवाहन आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.

Web Title: Selection of 2012 students for free admission in English school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.