७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 02:24 PM2022-11-15T14:24:58+5:302022-11-15T14:25:38+5:30

अमरावती येथील शब्द परिवार आयोजित हे संमेलन नेपाळमध्ये जानेवारीत होणार आहे 

Selection of Dagdu Lomte as the President of the 7th World Marathi Literature Conference in Nepal! | ७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड!

७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड!

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव, मसाप अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते दगडू लोमटे यांची अमरावती येथील शब्द परिवार या संस्थेच्या वतीने नेपाळ येथे आयोजित केलेल्या ७ व्या विश्व मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. अशी घोषणा शब्द परिवाराचे प्रमुख संजय सिंगलावर यांनी केली आहे.

शब्द परिवार अमरावती यांच्या वतीने २०१४ पासून हे विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू केले आहे. साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, गझल, ललित, आत्मकथन लेखन करणाऱ्या साहित्यिक यांच्या बरोबरच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यकर्ता यांना संमेलनाचे अध्यक्ष केले जाते. 
यापूर्वी बँकॉक, दुबई, इंडोनेशिया,मले, श्रीलंका, मालदीव येथे हे संमेलने झाली यावेळी ते नेपाळ येथे संपन्न होणार आहे. किशोर कदम (सौमित्र), ज्ञानेश वाकुडकर, संजय आवटे, सिद्धार्थ भगत व प्राचार्य नागनाथ पाटील यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. या वर्षी नेपाळ येथे होणाऱ्या ७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, साहित्यिक व साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण, कला क्षेत्रातील महत्वाचे कार्यकर्ता म्हणून कार्य केलेल्या दगडू लोमटे यांची निवड केलेली आहे.

त्यांच्या अनेक कविता, लेख प्रसिद्ध आहेत. राहून गेलेली पत्रे हे ललित बंध व पांगलेल्या प्रार्थना हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांना यापूर्वी  शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचा पुरस्कार परभणी, बाबा आमटे सामाजिक कार्य विशेष पुरस्कार शांतीवन बीड, स्नेहालय नगरचा डॉ. सुब्बाराव पुरस्कार, साहित्य व कला प्रसरिणी मंडळ पुणे विशेष कार्य पुरस्कार, मारवा फाऊंडेशन पुणे यांचा संगीत कार्य व प्रसारासाठी डॉ. अण्णासाहेब गुंजकर पुरस्कार, सामाजिक एकोपा व शांती यासाठी जमाते इस्लामी हिंद अंबाजोगाईचा सामाजिक सौहार्द पुरस्कार, आद्यकवी मुकुंदराज काव्य रत्न पुरस्कार, भारत जोडो अकादमी किनवट,  कार्यकारिणी सदस्य व सांस्कृतिक प्रमुख मराठवाडा साहित्य परिषद -  औरंगाबाद, ललित कला अकादमी, आनंदवन मित्र मंडळ अशा अनेक संस्थांचे  ते पदाधिकारी राहिले आहेत. 

१९८५ सालच्या बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियान सायकल यात्रेत  कन्याकुमारी ते कश्मीर त्यांचा सहभाग होता. या निवडीमुळे सर्वच स्तरातून दगडू लोमटे यांचे अभिनंदन होत आहे. मराठवाड्याला विश्व साहित्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे.

Web Title: Selection of Dagdu Lomte as the President of the 7th World Marathi Literature Conference in Nepal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.