काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या उच्च शिक्षण सहाय्यता निधी अंतर्गत तीन विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:33+5:302021-04-09T04:35:33+5:30
केज तालुक्यातील आडस येथील सुशील महेंद्र गायकवाड या होतकरू विद्यार्थ्याने बारावीत ७७.२३ टक्के गुण घेतले आणि नीट वैद्यकीय प्रवेशपूर्व ...
केज तालुक्यातील आडस येथील सुशील महेंद्र गायकवाड या होतकरू विद्यार्थ्याने बारावीत ७७.२३ टक्के गुण घेतले आणि नीट वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत ५२९ गुण मिळविले. त्याला औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्याचे वडील महेंद्र गायकवाड हे बांधकाम मजुर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न अवघे ४० हजार रुपये आहे. त्यांच्यावर सुशीलसह इतर दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. त्यांची हलाखीची आर्थिक स्थिती लक्षात घेत कै. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानने सुशीलला शिक्षण संपेपर्यंत प्रतिवर्षी २५ हजार रुपये सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला. याचा पहिला हप्ता ३० मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच, धारूर तालुक्यातील चोरंबा येथील दिक्षांत आणि वैभव गौतम भालेराव हे विद्यार्थी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यांचे वडील गौतम भालेराव हे काळी-पिवळी जीपचे चालक आहेत. आधीच भूमिहीन त्यात लॉकडाऊनमुळे वर्षभर व्यवसाय नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मुंबईच्या कुपर वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वैभवचा आणि धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दीक्षांतचा शिक्षणाचा खर्च करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे या दोन्ही होतकरू भावंडांना प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या प्रत्येकी ३० हजार रुपये सहाय्यता निधीचा पहिला हप्ता ३० मार्च रोजी देण्यात आला.
यावेळी कै. नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, उपाध्यक्ष प्रा. एस. के. जोगदंड, सहसचिव डॉ. नवनाथ घुगे, कोषाध्यक्ष मदनराव नरवडे, संचालक अंगदराव तट, देणगीदार माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण व अरूणराव पिंपळे उपस्थित होते. अतिशय काटेकोर निकष लावून प्रतिष्ठानकडून होतकरू गरीब विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण सहाय्यता निधीसाठी निवड केली जाते. यावर्षी १३ विद्यार्थ्यांना २ लाख ६० हजार रुपयांची मदत करण्यात आली. आतापर्यंत एकूण ५७ विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी ३२ लाख १५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. शनिवारी बाळासाहेब चव्हाण यांनी ५० हजार तर अरूण पिंपळे यांनी ११ हजार रुपयांची देणगी उच्च शिक्षण सहाय्य्यता निधीसाठी दिली. तसेच, अरुण पिंपळे यांनी प्रतिवर्षी ११ हजार रुपयांची देणगी देण्याचे यावेळी जाहीर केले.