'सेल्फी' पाण्याशी की मृत्यूशी; तरुणांचा जीवघेणा पर्यटन दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:40+5:302021-09-08T04:40:40+5:30
बीड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड व कपिलधारमधील घटना ताजी असूनही काही तरुण अद्यापही आयुष्यातील एक क्षण टिपण्यासाठी तरुण थेट ...
बीड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड व कपिलधारमधील घटना ताजी असूनही काही तरुण अद्यापही आयुष्यातील एक क्षण टिपण्यासाठी तरुण थेट आयुष्याशीस दोन हात करत असल्याचे दिसते. बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे सांडव्यातून पाणी दुथडी वाहत आहे असे असतानाही पाण्यासोबत ‘सेल्फी’ घेण्यासह वाहत्या पाण्यात उतरून फोटो सेशन करण्याचा मोह त्यांना आवरत नसल्याचे मंगळवारी दिसले. येथे सुरक्षा वाढविण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. माजलगावसह बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. बीड तालुक्यातील कपिलधार आणि पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे पाहण्यासाठी तरुणांसह नागरिकांची झुंबड उडत आहे. त्यातील काही लोक, तरुण थेट पाण्यासोबत फोटो सेशन करत असल्याचे दिसते. बिंदुसरा धरणातही मंगळवारी काही तरुण भिंतीवर उभा राहून 'सेल्फी' काढत होते. तसेच काही तरुणांनी सांडव्यात उतरून फोटो काढले. हा सर्व प्रकार जीवघेणा ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथे सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु. व्ही. वानखडे यांना दोनवेळा फोन केला; परंतु त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.
--
या घटना ताज्या असतानाच धाडस!
वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे अजय खळगे, मधुकर खळगे या बापलेकासह भैय्या उजगरे या तिघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. तसेच कपिलधार धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या यशराज कुडके वाहून गेला. सुदैवाने ओंकार विभूते बचावला. गेवराई तालुक्यात पशुधनही वाहून गेले. जीवितहानी झालेल्या या घटना ताज्या असतानाही तरुण फोटो काढण्याचे धाडस करत असल्याचे दिसते.
--
स्वत:ची सुरक्षा स्वत:च करणे अपेक्षित आहे तरी पण आम्ही धरणाशेजारी सायरन वाजवून आलोत. आता आणखी बंदोबस्त मागविला आहे; परंतु याकडे पाटबंधारे विभागानेही लक्ष द्यायला हवे.
संतोष साबळे, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणे, बीड
070921\07_2_bed_26_07092021_14.jpeg~070921\07_2_bed_24_07092021_14.jpeg
सांडव्याच्या वाहत्या पाण्याजवळ जात लहान मुलांसह पालक, तरूण फोटोसेशन करत आहेत. हा सांडवा सध्या दुथडी वाहत आहे.~बिंदुसरा धरणाच्या भिंतीवर उभा राहुन सेल्फी घेणारा तरूण.