ज्येष्ठांनी वाढविला लसीकरणाचा टक्का, सव्वालाख लोकांना टोचली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:32 AM2021-04-06T04:32:43+5:302021-04-06T04:32:43+5:30
बीड : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाल्यापासून टक्का झपाट्याने वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सव्वालाख लोकांना कोरोनाची लस ...
बीड : जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाल्यापासून टक्का झपाट्याने वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सव्वालाख लोकांना कोरोनाची लस टोचली असून यात ५६ हजार ज्येष्ठांचा समावेश आहे. तसेच १ लाख लोकांनी पहिला डोस घेतला असून दुसऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारी आरोग्य संस्थांप्रमाणेच खाजगीमध्येही आता गर्दी वाढू लागली आहे.
जिल्ह्यात १६ एप्रिलपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला हेल्थ केअर वर्कर्सला लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि आता चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना लस दिली जात आहे. जिल्ह्यात सुरुवातीला केवळ शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केले जात होते, आता खाजगी संस्थांनाही परवानगी दिली आहे. तसेच आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्येही लसीकरण सुरू केल्याने लाभार्थींची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख २२ हजार लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. जेव्हापासून ज्येष्ठांना लस दिली जात आहे, तेव्हापासून लसीकरणाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाकडूनही ज्येष्ठांचे हाल होणार नाहीत, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
डीएचओंच्या हस्ते केंद्राला सुरुवात
बीड शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, आयएमए अध्यक्ष डॉ.अनुराग पांगरीकर यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचाेले, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे, डॉ. संकेत बाहेती, डॉ. पैठणकर, शेंडगे आदींची उपस्थिती होती. पहिल्या लाभार्थीचा यावेळी सत्कारही करण्यात आला.
कोट
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कोरोना लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लसही मुबलक उपलब्ध आहे. दररोज आढावा घेतला जात आहे. ज्येष्ठांना लसीकरण सुरू झाल्यापासून आकडाही वाढला आहे.
डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड
---
===Photopath===
050421\052_bed_13_05042021_14.jpeg
===Caption===
खाजगी लसीकरण केंद्राची सुरूवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांनी केली. यावेळी डॉ.पांगरीकर, डॉ.चिंचोले, डॉ.कदम, डॉ.निपटे, डॉ.बाहेती, डाॅ.पैठणकर आदी.