बीड जिल्हा रूग्णालयात प्रसुतीनंतर मातेचा मृत्यू झाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 04:51 PM2019-01-25T16:51:17+5:302019-01-25T16:52:58+5:30
नवजात मुलगा सुखरूप असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बीड : प्रसुती झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत मातेचा मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्हा रूग्णालयात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. नवजात मुलगा सुखरूप असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माता मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जयश्री किशोर मस्के (२२ रा.हनुमाननगर, बीड) असे मयत मातेचे नाव आहे. जयश्री ही १६ जानेवारी रोज जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. प्रसुतीसाठी वेळ लागत असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यामुळे ती २१ जानेवारीला न सांगताच रूग्णालयातून निघुन गेली. त्यानंतर पुन्हा २२ जानेवारी रोजी त्या रूग्णालयात शरीक झाली. एक दिवस उपचार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती रूग्णालयात नोंद करून निघून गेली. २४ जानेवारीला पुन्हा सकाळी पावणे सहा वाजता ती रूग्णालयात दाखल झाली. त्यानंतर दोन तासांनी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलगा ठणठणीत होता, मात्र जयश्रीच्या शरीरात रक्त कमी असल्याचे डॉक्टरांना जाणवले. त्यांनी तात्काळ तिला रक्त दिले.
अचानक प्रकृती खालावली
शुक्रवारी सकाळीही तिने नेहमीप्रमाणे नाष्ता केला. सर्वांशी बोललीही. मात्र अचानक तिची प्रकृती खालावली. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील डॉ. किरण शिंदे, डॉ.शहाणे, डॉ.दीपाश्री मोराळे आणि सर्व परिचारीकांनी तिच्यावर उपचार करण्यास सुरूवात केले. तब्बल दीड तास तिच्यावर उपचार सुरू होते. सर्व तज्ज्ञ डॉक्टर तिच्याजवळ होते. मात्र तिला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालय परिसरात गर्दी केली होती. उशिरापर्यंत जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत याबाबत कसलीच नोंद झालेली नव्हती.
मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच कळेल
सदरील मातेवर उपचार केले होते. आमची सर्व टिम उपलब्ध होती. मृत्यूचे कारण शवविच्छेदन झाल्यावरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मला काही बोलता येणार नाही.
- डॉ. किरण शिंदे, वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हा रूग्णालय, बीड