शेतातून लाव्हारसासारखे द्रव्य बाहेर आल्याने गेवराई तालुक्यात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 02:17 PM2019-06-13T14:17:00+5:302019-06-13T14:18:42+5:30
महावितरण आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पाहणी केली
गेवराई (बीड ) : तालुक्यातील सिरसमार्ग जवळील पोखरी शिवारातील एक शेतातील विद्युत खाबांजवळील जमीनीतुन बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास लाव्हारसासारखे द्रव्य बाहेर येत आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे पोखरी व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 222 पासुन सिरसमार्गकडे जाणा-या रस्त्यावर पोखरी या गावाजवळ मधुकर मोघे यांचे शेत आहे. या शेतातील एका विद्युतखाबा जवळील जमिनीतून काल रात्री लाव्हारसासारखा द्रव्य बाहेर येवू लागला. काही क्षणातच याची वार्ता परिसरात पसरली. यानंतर ग्रामस्थांनी येथे गर्दी केली. काही वेळाने या द्रव्य पदार्थ बाहेर येणे बंद झाले.मात्र गाव आणि परिसरात यामुळे घबराहटीचे वातावरण आहे. आज सकाळपासून परिसरातील ग्रामस्थांनी हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली आहे. गावाच्या सरपंचानी मंडळ अधिकाऱ्यांना व महावितरण विभागास याची माहिती दिली. यानंतर महावितरण व महसूलच्या कर्मचाऱ्यांनी येथे भेट देऊन पाहिनी केली. विद्युतखांबावरून वीजप्रवाह जमिनीत उतरल्याने हा प्रकार झाल्याची माहिती महावितरणचे कर्मचारी राम इंगोले यांनी पाहणीनंतर दिल्याची माहिती तलाठी लक्ष्मण वोव्हाळ यांनी दिली.