खळबळजनक ! रुग्णालयातून 'पुरुष' जातीचे अर्भक चोरून 'स्त्री' जातीचे ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 07:03 PM2019-10-14T19:03:47+5:302019-10-14T19:11:34+5:30

मुलाच्या हव्यासापोटी बाळाची चोरी केल्याचा संशय

Sensational! Infants of 'male' breed were stolen from hospital by putting 'female' | खळबळजनक ! रुग्णालयातून 'पुरुष' जातीचे अर्भक चोरून 'स्त्री' जातीचे ठेवले

खळबळजनक ! रुग्णालयातून 'पुरुष' जातीचे अर्भक चोरून 'स्त्री' जातीचे ठेवले

Next
ठळक मुद्देस्वाराती रुग्णालयातून नवजात अर्भक चोरीला जिम्मेदारी आमची नसून नातेवाईकांची रुग्णालय प्रशासनाचे हात वर

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्नालयाच्या प्रसूती पश्चता कक्षातून सहा दिवसापूर्वी जन्मलेल्या पुरुष जातीच्या बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्याच वेळी रुग्णालयातील दुसऱ्या वार्डात एका महिला स्त्री जातीचे नवजात अर्भक ठेऊन पसार झाल्याने मुलाच्या लालसेतून त्या महिलेनेच बाळ चोरून नेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निमित्ताने रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

मागील आठवड्यात धारूर येथील हॉटेल चालक सैफ शेख यांची पत्नी सफिना या प्रसूतीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल झाली होत्या. बुधवारी सायंकाळी ७ वाजता त्यांनी पुरुष जातीच्या अर्भकाला जन्म दिला. सीझर झाल्यामुळे सफिना यांच्यावर सध्या रुग्णालयात वार्ड क्र. ६ मध्ये उपचार सुरु होते. आज सोमवारी दुपारी त्यांचे नातेवाईक थोड्या कालावधीसाठी बाहेर गेले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास बाळाला जवळ घेतलेल्या सफिना यांनाही झोप लागली. दुपारी १ वाजता जाग आल्यानंतर त्यांना शेजारी बाळ दिसून न आल्याने त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तेवढ्यात त्यांचे नातेवाईकही परतले आणि घटना समजल्यावर त्यांनी बाळाचा सर्वत्र शोध सुरु केला. परंतु, संपूर्ण रुग्णालयाचा परिसर पालथा घालूनही बाळाचा शोध लागला नाही. दरम्यान, याचवेळी एक महिला रुग्णालयातील वार्ड क्र. ८ मध्ये आली. प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करत तिने स्वतःजवळील अर्भक तिथे दाखल असलेल्या एका महिलेच्या जवळ ठेवले आणि पसार झाली. हे स्त्री जातीचे अर्भक सध्या रुग्णालय प्रशासनाच्या ताब्यात सुखरूप आहे. घटनेबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे, दहिफळे आणि जमादार कुलकर्णी यांनी रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली. या दोन्ही घटनाचा एकमेकांशी काही संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्या महिलेनेच मुलाच्या हव्यासापोटी मुलगी ठेऊन ते बाळ चोरून नेले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे स्वाराती रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे बंद :
सदरील इमारतीच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. पण सुरक्षा किती तकलादू आहे याचा प्रत्यय आज आला. या कॅमेऱ्यापैकी केवळ १४ कॅमेरेच सुरु असून उर्वरित बंद आहेत. त्यामुळे अर्भक चोरणाऱ्या महिलेची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. वार्डाच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा नेमके आज सकाळपासून बंद पडला असल्याचे समजते. दरम्यान, एक महिला आणि तरुण संशयास्पद अवस्थेत रुग्णालयातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे.

नातेवाईकांचा संताप :
अवघे सहा दिवसापूर्वी जन्मलेले बाळ चोरीला गेल्यामुळे त्याच्या आईची अवस्था अत्यंत बिकट आहे. बाळाचे वडील सैफ शेख आणि त्यांचे नातेवाईक तीव्र संताप व्यक्त करत असून या घटनेसाठी त्यांनी ढिसाळ प्रशासनाला दोषी धरले आहे. तर, बाळ सांभाळण्याची जिम्मेदारी आमची नसून नातेवाईकांची असल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने हात वर केले आहेत.

Web Title: Sensational! Infants of 'male' breed were stolen from hospital by putting 'female'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.