नाईटड्यूटीवर असताना सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत
By सोमनाथ खताळ | Published: September 8, 2023 06:45 PM2023-09-08T18:45:32+5:302023-09-08T18:45:58+5:30
आपल्या मुलीसमान असलेल्या नर्सलाच या शिपायाने रात्रीच्यावेळी अश्लिल मेसेज पाठविल्याचे समोर आले.
बीड : वडवणी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५५ वर्षीय शिपायाने कंत्राटी नर्सला व्हॉट्सअपवर अश्लिल मेसेज पाठविले. या नर्सने तक्रार केल्यावर वैद्यकीय व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल दिला. त्यावरून या शिपायाला निलंबीत करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी शक्रवारी ही कारवाई केली.
सय्यद अतिक सय्यद रफिक असे या शिपायाचे नाव आहे. चार महिन्यापूर्वी हा शिपाई वडवणी तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात बदलून गेला होता. ५ ऑगस्ट रोजी त्याची रात्रपाळीची ड्यूटी आरोग्य केंद्रात होती. याच दिवशी एक कंत्राटी परिचारीकाही कर्तव्यावर होत्या. त्याने एकटी असल्याचा गैरफायदा घेत नर्सला व्हाटस्अपवर अश्लिल मेसेज पाठविले. हा प्रकार नर्सने वैद्यकीय अधिकारी व तालुका आराेग्य अधिकारी यांना सांगितला. त्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांना दिला. पाठक यांनी सर्व बाजू तपासून घेत या शिपायावर शुक्रवारी निलंबणाची कारवाई केली. या कारवाईने नर्स व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिपायाच्या मुलीही डॉक्टर
सय्यद अतिक यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहे. त्या देखील रूग्णसेवा करत आहेत. परंतू आपल्या मुलीसमान असलेल्या नर्सलाच या शिपायाने रात्रीच्यावेळी अश्लिल मेसेज पाठविल्याचे समोर आले. हा प्रकार समजल्यावर नातेवाईकांनीही त्याला चांगलाच चोप दिला होता. दरम्यान, यात निलंबणाची कारवाई झाली असली तरी अद्यापही पोलिस ठाण्यात याची नोंद झालेली नाही. तसेच याच शिपायाची विभागीय चौकशीही प्रस्ताविक करण्यात आली असून तोपर्यंत त्याला आष्टी पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. यापूर्वीही त्याच्यावर एकेवळा निलंबणाची कारवाई झाली होती, असे सूत्रांनी सांगितले.