वाळू तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र शस्त्रधारी विभाग नेमावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:35+5:302021-05-05T04:55:35+5:30
गेवराई : तालुक्यात सोमवारी रोजी परत एकदा महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी मारहाण करत थेट तहसील कार्यालयातील ट्रक पळविला असल्याची ...
गेवराई : तालुक्यात सोमवारी रोजी परत एकदा महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी मारहाण करत थेट तहसील कार्यालयातील ट्रक पळविला असल्याची घटना घडली. आता वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र शस्त्रधारी विभाग नेमावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी मेलद्वारे केली आहे.
वाळू माफियांकडून प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करण्याच्या सतत घटना घडत आहेत. दोन महिन्यापूर्वी तहसीलदारासह गुंतेगाव येथे पथकावर हल्ला केला होता. १५ दिवसापूर्वी टोल नाक्यावर देखील मंडळ अधिकारी यांच्या गाडीला धक्का देऊन पथकाला मारहाण केली होती. काही महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला होता. एवढे होऊन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल होतो. आरोपी सापडत नाहीत. वाहन सापडत नसून कुठे तरी शासनाचा दंड वाचवण्यासाठी व आमचे काम चालू आहे हे दाखवण्यासाठी काही खोटे प्रकार घडत आहेत. तरी त्याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र शस्त्रधारी विभाग नेमावा, अशी मागणी मोटे यांनी निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.