कोरोनाचे गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:00+5:302021-04-29T04:25:00+5:30
अंबाजोगाई- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने रुग्णालयात जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत ...
अंबाजोगाई- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने रुग्णालयात जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.यात अनेक गंभीर रुग्णांचाही समावेश आहे तर उपचारात निष्काळजीपणा होत असल्याने घरात राहणाऱ्या रुग्णांमुळे बाधितांची संख्याही वाढू लागली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज तीनअंकी रुग्ण निघत आहेत. १ ते २५ एप्रिलपर्यंत या कालावधीत अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे ८४६४ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी येथील कोविड सेंटर अशा दोन ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरात राहूनच उपचार घेत आहेत. घरात राहून उपचार घेणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहून १७ दिवस उपचार घ्यावे लागतात. अशा रुणांना सार्वजनिक ठिकाणी अथवा इतरत्र जाता येत नाही. तरीही असे रुग्ण इतरत्र फिरत असतात. जोपर्यंत निगराणी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वॉच आहे, तोपर्यंतच हे लोक घरात राहतात. अन्यथा पुन्हा स्थिती जैसे थे राहते.
आता रुग्णसंख्या वाढत चालल्याने अनेक ठिकाणी गंभीर रुग्णही घरात राहूनच उपचार घेत आहेत. घरात असणारे रुग्ण नियमित औषध व उपचार घेत असताना खबरदारी बाळगत नसल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढत आहे. शासनाच्या वतीने खाटा वाढविण्याबाबत उपाययोजना सुरू असल्यातरी ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. एकंदरीत वाढत्या रुग्णसंख्येचा मोठा फटका सामान्य रुग्णांना बसू लागला आहे.
गृहविलगीकरणाची कारणे काय?
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर बहुतांश कोविड केंद्र बंद करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले. त्या तुलनेत खाटा कमी पडू लागल्या. परिणामी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरातच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जाऊ लागला.
असे आहेत नियम...
रुग्ण बाधित झाल्यापासून दहा दिवस गृहविलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. उपचारानंतर रुग्णांनी पुढील ७ दिवस घरातच राहणे गरजेचे आहे. असे एकूण १७ दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-------
अंबाजोगाई तालुक्यातील एकूण रुग्ण-८४६८
बरे झालेले रुग्ण-६२८५
उपचार सुरू असलेले -२१७४
गृहविलगीकरणातील रुग्ण-१४७६
-----------