सेरो सर्वेक्षण; २५.९६ नागरिकांमध्ये, तर २१.६५ टक्के आरोग्यकर्मींमध्ये ॲन्टिबॉडीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:04+5:302021-02-11T04:36:04+5:30
बीड : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीनवेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष दिला असून, २५०९६ टक्के ...
बीड : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीनवेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष दिला असून, २५०९६ टक्के सामान्य नागरिकांमध्ये, तर २१.६५ टक्के हेल्थकेअर वर्करमध्ये ॲन्टिबॉडीज आढळून आल्या आहेत. राज्यातील बीडसह परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव या सहा जिल्ह्यांत हे सर्वेक्षण झाले होते. या अहवालातून नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
आयसीएमआरच्यावतीने सेरो सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील बीडसह परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव हे सहा जिल्हे निवडले होते. २१ मे ते ३० मे दरम्यान पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान दुसरा टप्पा, तर २३ ते २९ डिसेंबरदरम्यान तिसरा टप्पा पार पडला होता. या सर्व्हेक्षणात नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टिबॉडीज तयार होत आहेत का, याचे संशोधन करण्यात आले होते. या सहा जिल्ह्यांतील २ हजार ५५३ सामान्य नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासले होते. यात ६६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबरोबरच पहिल्यांदाच आरोग्यकर्मींचेही रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. यात सहा जिल्ह्यांतील ६६५ रक्त नमुने घेतले असता, १४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याचा टक्का २१.६५ एवढा आहे. कोरोनात सर्वात पुढे होऊन लढा देत असतानाही आरोग्यकर्मींमध्ये मोठ्या प्रमाणात ॲन्टिबॉडीज आढळल्या आहेत.
नागरिकांमध्ये सांगली, तर आरोग्यकर्मींमध्ये बीड अव्वल
सांगली जिल्ह्यात नागरिकांमध्ये सार्वाधिक ३६.६ टक्के, तर आरोग्यकर्मींमध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक २५.८ टक्के ॲन्टिबॉडीज आढळल्या आहेत. सर्वात कमी १६.१ टक्का परभणी जिल्ह्यात आढळल्या आहेत. नागरिकांमध्येही परभणीतच १९ टक्के ॲन्टिबॉडीज आढळल्या आहेत.
कोट
आयसीएमआरचा तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाला आहे. बीडमध्ये सामान्य नागरिकांमध्ये २३.३, तर हेल्थकेअर वर्करमध्ये २५.८ टक्के ॲन्टिबाॅडीज आढळल्या आहेत. वाढता टक्का पाहून सामान्यांसह आरोग्यकर्मींमधील कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा निष्कर्ष निघतो.
डॉ. आर .बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
----
अशी आहे आकडेवारी
सामान्य नागरिकांची चाचणी व अहवाल
जिल्हाचाचणीपाॅझिटिव्ह टक्का
बीड ४२१ ९८ २३.३
परभणी ४२६ ८१ १९
नांदेड ४२० १०९ २६
सांगली ४२६ १५६ ३६
अहमदनगर ४३३ ९८ २२.६
जळगाव ४२७ १२१ २८.३
एकूण २५५३ ६६३ २५.९६
————
हेल्थकेअर वर्करची चाचणी व अहवाल
जिल्हाचाचणीपाॅझिटिव्ह टक्का
बीड १२० ३१ ३१
परभणी ११८ १९ १६.१
नांदेड १०७ २१ १९.६
सांगली ११४ २९ २५.४
अहमदनगर १०३ २१ २०.४
जळगाव १०३ २३ २२.३
एकूण ६६५ १४४ २१.६५
————