एसबीआयच्या मुख्य शाखेत सर्व्हर रुमला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:25 PM2019-12-22T23:25:43+5:302019-12-22T23:26:30+5:30

शहरातील जालना रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीला मागील बाजुला असलेल्या सर्व्हर रुम, यूपीएस बॅटरी रुमला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

Server room fire at SBI main branch | एसबीआयच्या मुख्य शाखेत सर्व्हर रुमला आग

एसबीआयच्या मुख्य शाखेत सर्व्हर रुमला आग

Next
ठळक मुद्देशॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज : अडीच तासानंतर अग्निशामक जवान, तरुणांनी मिळवले नियंत्रण

बीड : शहरातील जालना रोडवरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीला मागील बाजुला असलेल्या सर्व्हर रुम, यूपीएस बॅटरी रुमला अचानक आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले असून अग्निशामक दलाचे जवान आणि धाडसी तरुणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास अडीच तास शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान या घटनेत डाटा बॅँकेसह महत्वाची संपदा सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील जालना रोडवर एसबीआयचे क्षेत्रीय कार्यालय आहे. रविवारी सायंकाळी बॅँकेच्या इमारतीमधून धूराचे लोट निदर्शनास येताच जागरुक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बॅँकेच्या इमारतीच्या मागील बाजुने धूर निघत असल्याचे लक्षात येताच सीज फायरने आग विझविण्याचा प्रयत्न तेथील कर्मचाऱ्यांनी केला. तर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तर पोलीस विभागाला कळविण्यात आले. अग्निशमक दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत धायतडक, रमेश आदमाने, हनमंत ससाणे, प्रमाकर मस्के, लक्ष्मण टेकाळे, अमोल सांगळे, गोरख ढाकणे, अमोल नागरे, गोविंद केंद्रे, आकाश राठोड, सूरज राठोड, तुकाराम राठोड आदी जवान दोन वाहनांसह तत्काळ पोहचले.
इमारतीच्या मागील बाजुस बॅँकेचे सर्व्हर रुम तसेच यूपीएस बॅटरी रुम आहे. तेथून धूर निघत असल्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले. तोपर्यंत इमारतीमध्ये धुर पसरला होता. काही धाडसी तरुण व नगरसेवकांसह बॅँकेच्या सेवकांनी अग्निशामक जवानांना मदत करत इमारतीत जाऊन धूर मोकळा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. दरम्यान पसिरात मोठी गर्दी झाल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. ज्या रूममधून धूर येत होता, तिथपर्यंत पोहचून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न दोन तास सुरुच होते.
सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दरम्यान आग इतरत्र पसरु नये व दुर्घटना घडू नये म्हणून या भागातील विद्युत पुरवठा काही वेळ बंद ठेवावा लागला. आगीत सर्व्हर, बॅटरी रुमसह फर्निचरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
रविवारी सुटी असल्याने परिसरात शुकशुकाट होता. या घटनेमध्ये नेमके किती आणि कोणते नुकसान झाले आहे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी होते.
डाटा बॅँक सुरक्षित : ग्राहकांना अडचण नाही
या आगीत ग्राहकांना व बॅँकेला अडचणी होईल असे नुकसान झाले नसल्याचे समजते. डाटा बॅँक तसेच महत्वाच्या फाईल सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान बॅँकेचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकिशोर भोसले हे हैद्राबाद येथे बैठकीसाठी गेले होते. रात्री नऊच्या सुमारास ते बीडकडे परतत होते.
जीव धोक्यात घालून जवान इमारतीवर
बाहेरून आग आटोक्यात येत नसल्याचे समजल्यावर बीड पालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन जवान शिडीच्या आधारे आग लागलेल्या खिडकीच्या ठिकाणी पोहचले. जीव धोक्यात घालून दोन जवानांनी खिडकीतून आत पाणी मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून धुराचे लोट बाहेर येत होते. याला झुगारून हे कर्मचारी आग विझवित होते.

Web Title: Server room fire at SBI main branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.