एकाच सरणावर सात जणांना अग्निडाग; उपस्थितही गहिवरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:04 AM2019-11-12T00:04:43+5:302019-11-12T00:05:40+5:30
तालुक्यातील निवडुंगवाडी येथील भीमराव व बन्सी मुंडे या दोन भावांवर त्यांच्या कुटुंबातील भाऊ, पत्नी, सून, नातू व पुतण्या व मुलावर थरथत्या हाताने अग्निडाग देण्याची वेळ काळाने आणली. पाटोद्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात मुंडे कुटुंबातील सातजण जागीच ठार झाले होते.
दीपक नाईकवाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील निवडुंगवाडी येथील भीमराव व बन्सी मुंडे या दोन भावांवर त्यांच्या कुटुंबातील भाऊ, पत्नी, सून, नातू व पुतण्या व मुलावर थरथत्या हाताने अग्निडाग देण्याची वेळ काळाने आणली. पाटोद्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात मुंडे कुटुंबातील सातजण जागीच ठार झाले होते. सायंकाळी निवडूंगवाडी येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नशिबानं थट्टा मांडत आणलेली क्रुर वेळ सहन होत नव्हती. अग्निडाग देताना भीमरावांचे हात थरथरले आणि उपस्थितांमध्ये अश्रुंचा बांध फुटला.
निवडुंगवाडी येथील मुंडे कुटुंबीय देवदर्शनासाठी निवडुंगवाडी येथून सोमवारी सकाळी जीप मधून पाटोदा तालुक्यातील देव मोठ्या आनंदाने निघाले होते. घरातून जाऊन एक तासही लोटला नाही तोच त्यांच्या जीपचा अपघात झाला. तासाभराने आठ जण ठार झाल्याची वार्ता निवडुंगवाडीत कळताच ऐकणाऱ्यांनाही धक्का बसला.
या अपघातात ठार झालेल्यांमध्ये आई, मुलगा, दीर, भावजयी, नातवासह सून असे एकाच कुटुंबातील सातजण तर एक व्याही अशा आठ जणांचा समावेश होता. संपूर्ण गावात शोककळा सरली होती. दिवसभर गावात एकाच्याही घरी चूल पेटली नव्हती. गावातील महिला, पुरुषांनी मुंडे कुटुंबियांच्या घरी धाव घेत त्यांच्या दु: खात सहभागी झाले होते. देवा असं का केलं... काय चुकलं....सगळंच गेलं.. आता कसं राहयचं म्हणताना घरातील व्यक्तींच्या भावना अनावर झाल्या होत्या. यावेळी येथे उपस्थितांच्या डोळ्यातून निघणारे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.
नातेवाईकांसह कुटुंबियांचा आक्रोश आवरणारेही झाले स्तब्ध
‘फारच वाईट झाले, असे प्रत्येकजण म्हणत होते. मुंडे कुटुंबियांचे सांत्वन करत घराबाहेर डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते.
अपघात होऊन सात तास झाले होते. सूर्य मावळतीकडे निघाला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन जीप व एका रुग्णवाहिकेतून अपघातातील मृतदेह निवडुंगवाडीत आणले.
यानंतर मात्र नातेवाईकांसह मुंडे कुटुंबीयांचा आक्रोश आवरणारेही स्तब्ध झाले.
गावाजवळील स्मशानभूमीत भीमराव मुंडे यांनी पत्नी, सून,नातींसह भाऊ, भावजयी आणि भावास थरथरत्या हाताने अग्निडाग दिला. यावेळी केज, नेकनूर, नांदूर, डोईफडवाडीसह परिसरातील नातेवाईकांसह शेकडो नागरीक उपस्थित होते.