बीड जि.प.मध्ये आत्मदहनाच्या प्रयत्नातील सात जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:11 AM2019-01-09T00:11:58+5:302019-01-09T00:12:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : तालुक्यातील नेकनूर येथील एका खासगी संस्थेतील चार शिक्षक व तीन शिक्षकांचे पती असे सात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तालुक्यातील नेकनूर येथील एका खासगी संस्थेतील चार शिक्षक व तीन शिक्षकांचे पती असे सात जण जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परीषदेत पोहचले. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत या सर्वांना ताब्यात घेतले. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. त्रुटींची पूर्तता करुन अनुदान द्यावे या मागणीसाठी त्यांनी हा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येते.
मुख्याध्यापक पठाण रिजवान खान (रा. बलभीम चौक, बीड), शिक्षक मनियार इस्माईल मुसा, सय्यद अब्दूल बारी (दोघे रा. नेकनूर), बन्सी पर्बत हांगे (रा. नांदूरघाट ता. केज) व शिक्षिका पती शेख मुजमील शेख खलील, सय्यद मोहसीन सय्यद सलीम (दोघे रा. नेकनूर), शेख मुसा शेख रफीक (रा. शहेंशाहनगर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. हे सर्व बीड तालुक्यातील नेकनूर येथील बहादूरशहा जफर उर्दू हायस्कूलचे असल्याचे सांगण्यात येते.
२०१३-१४ मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गांना अनुदान मंजूर झाले होते. मात्र, इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात पटसंख्या कमी होती. प्रत्येक वर्गात ३० पेक्षा कमी विद्यार्थी आढळल्याने या तीन वर्गांना अनुदान नाकारले होते. दरम्यान, आता तिनही वगार्तील पटसंख्या वाढली असून त्या आधारे अनुदान मंजुरीसाठी प्रस्ताव शासनास पाठविण्याची मागणी संस्थेतील सात शिक्षकांनी केली होती.
मात्र, शासन निर्णयानुसार २०१३- १४ नंतर मूल्यांकन न झाल्याने असा प्रस्ताव पाठविता येत नाही. त्यामुळे सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याऐवजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मुख्याध्यापकासह सात जण हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन जि. प. मध्ये पोहोचले. शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे यांच्या दालनात त्यांनी ठिय्या दिला. त्यानंतर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी कर्मचाºयांसह धाव घेत या सातही जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकारी (मा.) भगवान सोनवणे हे शिवाजीनगर ठाण्यात तळ ठोकून होते. सोबत उपशिक्षणाधिकारी मोहन काकडे हेही होते.
खळबळ : प्रतिबंधात्मक कारवाई
शिक्षण विभागात जि.प.सह खाजगी शाळांची प्रकरणे असतात. यंत्रणा शासन निर्णयानुसार काम करते. आक्रमकपणे वर्तन करुन यंत्रणेवर दबाव आणण्याचे प्रकार यापुर्वीही घडले आहेत. सनदशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.