‘सरकारी बाबू’नी श्रमदानातून लावली सत्तर रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:37 AM2018-07-02T00:37:58+5:302018-07-02T00:39:15+5:30
एकीकडे काही शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध ओरड चालू असताना दुसरीकडे मात्र आपल्या सहकाºयांना साथीला घेत श्रमदान करून वृक्षारोपण करणारा निसर्गप्रेमी अधिकारी बीडमध्ये पहावयास मिळत आहे.
सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एकीकडे काही शासकीय-निमशासकीय अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध ओरड चालू असताना दुसरीकडे मात्र आपल्या सहकाºयांना साथीला घेत श्रमदान करून वृक्षारोपण करणारा निसर्गप्रेमी अधिकारी बीडमध्ये पहावयास मिळत आहे.
बीड जिल्हा कोषागार अधिकारी श्रीरंग भुतडा यांनी हा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. भुतडा यांनी आपल्या कार्यालयातील ४५ कर्मचाºयांना सोबत घेऊन श्रमदानातून बीडपासून ११ कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळवाडी परिसरातील वृंदावन निवासी वसतीगृहाच्या परिसरात आठ दिवसांपूर्वीच खड्डे खोदले होते. ३० जून रोजी या सर्वांनी या खड्ड्यात आंबा, पेरू, जांभूळ, चिंच, वड, पिंपळ, कडूनिंब आदि जातीची जवळपास ७० रोपे लावली. गतवर्षी लोकमतने पुढाकार घेऊन २१ झाडे लावून वृक्षारोपणाचा शुभारंभ केला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत अनेकांनी जवळपास २५० रोपे लावली. विशेष म्हणजे ती सर्व रोपे या विद्यार्थ्यांनी चांगले संगोपन करून जगविली. अजूनही रोपे लावण्याचा संकल्प अॅड. युवराज बहिरवाल आणि श्रीरंग भुतडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
यासंदर्भात बोलताना श्रीरंग भुतडा म्हणाले की, माझा सहकारी राजू गोरे यांच्यामुळे वृंदावनच्या संपर्कात आलो आहे. राजूचे वडील लहाणपणीच वारले होते. निराधाराचे दु:ख अनुभवल्यामुळे राजू यास वृंदावन आणि विद्यार्थ्यांबद्दल आस्था आहे. गतवर्षी त्याच्यासोबत मी येथे आलो होतो. निसर्गरम्य वातावरण पाहून मी प्रेमात पडलो. आपल्या कर्मचारी सहकाºयांना घेऊन श्रमदानाचे, निसर्गाचे महत्त्व समजून सांगितले. आपल्या नेहमीच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून निसर्गासाठी काहीतरी वेगळे केल्याचे समाधान आज या सर्वांना आहे. काही जणांनी तर अजून श्रमदानातून अशीच रोपे लावण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. येथे पाण्याची सोय आहे, संगोपण करण्यासाठी मुले आहेत, यातून या मुलांनाही निसर्गाबद्दल ओढ निर्माण होईल, पर्यावरणास मदत होईल, असे भुतडा यांनी सांगितले.
मुलांसाठी संघर्ष चालूच : युवराज बहिरवाल
अतिशय निसर्गरम्य असलेल्या पिंपळवाडी गावच्या परिसरात निराधार, वंचित मुलांसाठी अॅड. युवराज बहिरवाल यांनी गेल्यावर्षीपासून वृंदावन मोफत निवासी वसतीगृह उभारले असून त्यांच्या भोजन, निवासासह शैक्षणिक खर्चाचीही सोय केली आहे. आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकºयांच्या मुले, उसतोड कामगारांची मुले आणि आर्थिक परिस्थितीमुळे जी मुले शिक्षणापासून वंचित राहतात, अशा मुलांना युवराज बहिरवाल यांनी या ‘वृंदावनांत आसरा दिला असून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. यासंदर्भात बोलताना बहिरवाल म्हणाले की, गतवर्षी या वसतीगृहात जवळपास ३५ मुले होती, ही संख्या वाढून यावर्षी आतापर्यंत ७० च्या पुढे गेली असून अजूनही प्रवेश घेणाºयांची संख्या वाढतच आहे. कुठलीही शासकीय मदत नसल्यामुळे या मुलांचे पालनपोषण करणे कठीण जात असले तरी या दानशूर, दात्यांच्या मदतीमुळे यावरही आम्ही मात करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या श्रमदानाच्या वेळी कर्मचारी गलगुंडे यांनी या विद्यार्थ्यांना एक दिवसाचे जेवण दिले. ज्यांना आमच्या या वृंदावनच्या कार्याची माहिती आहे, असे लोक आपापल्या परिने मदत करतात. कुणी येथे वाढदिवस साजरा करून या मुलांनाही त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतात, असे ते म्हणाले.
बाबा देवाघरी गेलाय, तो येणार हाय..
कोषागार कार्यालयातीलच एका कर्मचाºयाने या मुलांना खेळण्यासाठी क्रिकेटचे साहित्य देण्याचे आश्वासन दिले. आपले दु:ख उराशी बाळगून जीवनाशी संघर्ष करणाºया या मुलांना दात्यांची ही आपुलकी उभारी आणणारी ठरते. यापैकी अनेक मुले वयाने खूपच लहान आहेत. अनेकांना आपला पिताही आठवत नाही. माझा बाबा देवाघरी गेलाय, तो येणार आहे, असे सांगतात. या मुलांना पाच सहा कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेऊन जावे लागते. एवढे चालणे त्यांना सोसत नाही. या मुलांना ने-आणण्यासाठी छोट्या बसची आवश्यकता आहे. त्यामुळे या मुलांचा त्रास वाचेल आणि सुरक्षितता वाढेल. गाडीचे बजेट मोठे असून सध्याच्या बिकट आर्थिकस्थितीत परवडणारे नसले तरी मुलांसाठी आवश्यक बाब आहे. आतापर्यंत या मुलांच्या भवितव्यासाठी पदरमोड केली आणि यापुढेही करतच राहणार. काही महिन्यांपासून माझे वडील आजारी असून त्यांच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या असून, बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. यामुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक स्थितीशी सामना करीत आहे. लोकांच्या आशीर्वादातून यातूनही मार्ग निघेल, अशी आशाही युवराज बहिरवाल यांनी व्यक्त केली.