आडस येथे एकाच रात्री चोरट्यांनी फोडली सात दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:25 PM2018-08-14T18:25:58+5:302018-08-14T18:27:03+5:30
तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सात दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
केज ( बीड ) : तालुक्यातील आडस येथील मुख्य बाजारपेठेतील सात दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठेतील सात दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी तिजोरीतील रोख रक्कम पळवली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये सदरील चोरटे कैद झाले आहेत. यात तीन चोरटे दुकान लुटताना दिसत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आर.आर. मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, ठसे तज्ज्ञ यांनी अधिक तपास सुरु केला आहे. याबाबत परमेश्वर भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत रोख २९ हजार रुपये चोरीस गेल्याचे नमूद आहे.