आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्याच्या सुरक्षेसाठी सात पथके तैनात; मृत होताच पथकाला कळवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:03+5:302021-01-15T04:28:03+5:30
कडा : आठ दिवसांपासून तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण सुरू झाली असून ब्रम्हगांवसह शिरापूर येथे देखील कोंबड्या दगावल्याची घटना घडली ...
कडा : आठ दिवसांपासून तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण सुरू झाली असून ब्रम्हगांवसह शिरापूर येथे देखील कोंबड्या दगावल्याची घटना घडली असून याला प्रतिबंध घालण्यासाठी आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्याच्या सुरक्षेसाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली असून प्रत्येक पथकात चार कर्मचा-यांचा सहभाग आहे. कुठे मृत पक्षी अथवा कोंबड्या आढळून आल्यास पशुसंर्वधन विभागाला कळविण्याचे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी कार्यालयात १९ व्या पशु गणणेनुसार ३ लाख ६६ हजार ५८१ एवढी कोंबड्याची संख्या आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूण मोठ्या प्रमाणावर कुकुटपालन व्यवसायाकडे वळले असून कोंबड्याचे शेड देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभा केलेल्या या व्यवसायाला आता कठिण दिवस आलेत. आठ दिवसापासून शेजारील तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने कावळ्याचा मुत्यु झाले, त्याच बरोबर तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही एक पक्षी मृत आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बारा गावे कंटेनमेन्ट झोन घोषित केले. याच धर्तीवर अशा घटना कुठे घडल्या तर लगेच पाहणी व निदानासाठी पंचनामा करून पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक पशुधन विकास अधिकारी, तीन सहाय्यक परिचर अशी टीम सक्रिय राहणार आहे. तालुक्यात बर्ड फ्ल्यूच्या भितीने न घाबरता पक्षी अथवा कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यास पशुसंर्वधन विभागाला कळवावे. आम्ही यासाठी सात पथके स्थापन करण्यात आली असल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी लोकमतला सांगितले.