पोस्ट कोविडचे अनेक रुग्ण स्वारातीमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:33 AM2021-05-12T04:33:59+5:302021-05-12T04:33:59+5:30
अत्यावश्यक शस्त्रक्रियेतून एकाचे प्राण वाचविण्यात यश अंबाजोगाई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार असतांनाच आता पोस्ट कोविडच्या रुग्णांतही मोठ्या ...
अत्यावश्यक शस्त्रक्रियेतून एकाचे प्राण वाचविण्यात यश
अंबाजोगाई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार असतांनाच आता पोस्ट कोविडच्या रुग्णांतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पोस्ट कोविडचे अनेक रुग्ण स्वारातीमध्ये व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. यापैकी पाच रुग्ण अतिगंभीर स्वरुपाचे आजारी असून, त्यापैकी एका रुग्णाचे निधन झाले आहे, तर एकाचे प्राण वाचविण्यासाठी स्वारातीमध्ये नुकतीच एक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली.
उपचारासाठी येणाऱ्या पोस्ट कोविड रुग्णांच्या नाकांमध्ये आणि डोळ्याखालील चेहऱ्यावरील नाकाजवळच्या उंच भागावर ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) नावाचा आजार बळावत आहे. नाकामध्ये निर्माण झालेले हे ब्लॅक फंगस नाकातून डोळ्याखालील व वरील कपाळाच्या खालच्या बाजूस असलेल्या मोकळ्या पोकळीत जाऊन शरीरातील इन्फेक्शन वाढवत ते डोळे आणि मेंदूवर तीव्र आघात करतात. हे इन्फेक्शन वाढले तर रुग्णांचा डोळा बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. शिवाय या आजारात रुग्ण दगावण्याची शक्यताच अधिक असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पोस्ट कोविड आजारांवरील उपचारासाठीच्या कसल्याही गाईडलाईन जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने अथवा केंद्रीय व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आजपर्यंत देण्यात आलेल्या नसल्यामुळे उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टरही संभ्रमात आहेत.
यासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या आजारामध्ये नाकामध्ये, डोळ्यात वेदना होणे, नाकातून चिकट लालसर स्राव येणे व डोळ्याच्या आजूबाजूला सूज येणे ही प्राथमिक लक्षणे दिसतात. हा आजार प्रामुख्याने मधुमेह असलेल्या व नसलेल्यांमध्येही दिसून येत आहे. हा आजार वेळीच आटोक्यात आला नाही तर डोळ्यांमध्ये पसरून कायमचे अंधत्व किंवा डोळा पूर्णपणे खराब करून मेंदूकडे पसरतो व रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा आजार डोळ्यांमध्ये पसरण्याच्या अगोदर लक्षात येणे महत्त्वाचे ठरते.
कोविड झालेल्या रुग्णांनी कोविडची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये नाक नॉर्मल सलाईनने स्वच्छ करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण पंधराव्या व बाविसाव्या दिवशी तपासून पाहणे, ज्या रुग्णांना कोविडच्या उपचारांमध्ये इंजेक्शन तोसिलिझुमाब, रेमडेसिविर दिले आहे, तसेच ज्यांना पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे किंवा स्टेरॉइडचे इंजेक्शन, गोळ्या दिल्या आहेत व ज्यांचे शुगर कंट्रोल नाही, अशा सर्व रुग्णांनी नाकामध्ये बुरशीची लागण झाली आहे की नाही, हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब पंधराव्या व बाविसाव्या दिवशी तपासून घ्यावा. म्हणजे आजाराचे निदान लवकर होऊ शकते.
स्वारातीत झाली एक शस्त्रक्रिया
पोस्ट कोविडची अशीच लक्षणे असलेल्या एका रुग्णावर स्वारातीत एक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णास ब्लॅक फंगस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे त्याचे इन्फेक्शन डोळे, नाक आणि डोळ्याच्या मागील बाजूस झाले होते आणि रुग्णाचा डोळ्याचा बराचसा भाग बाहेरही आला होता. रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे प्राण वाचवण्यासाठी नाक, कान, घसा विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे आणि नेत्र विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.