बीड जिल्हा रूग्णालयाच्या छतावर आंबट चाळे : तीन दिवस उलटले तरी मजनुंवर कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 05:59 PM2019-11-08T17:59:37+5:302019-11-08T18:03:41+5:30
सीएसने आदेश दिल्यानंतरही फिर्याद देण्यास सुरक्षा रक्षकांची उदासिनता
बीड : जिल्हा रूग्णालयाच्या छतावर आंबट चाळे करताना एका महिलेसह दोन पुरूषांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे पत्र रूग्णालय प्रशासनाने शहर पोलिसांना दिले. शहर पोलिसांनी फिर्याद देण्यास सांगितले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कर्मचारी व रक्षकांना आदेश दिल्यानंतरही अद्याप कोणीच ठाण्यात पोहचलेले नाहीत. तीन दिवस उलटूनही कारवाई रखडल्याने यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
धक्कादायक ! चक्क जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीवर ‘आंबट चाळे’
जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ च्या छतावर ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री मद्यप्राशन करून आंबट चाळे करताना एका वॉर्ड बॉयने पाहिले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रूग्णालयाची तक्रार आहे की नाही हे न विचारताच केवळ महिलेची तक्रार नाही, असे सांगून या तिघांनाही ‘लाख’ मोलाची मदत पोलिसांनी केली होती. मात्र, हा प्रकार ‘लोकमत’ने लावून धरल्यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. सुरक्षा रक्षकांना ठाण्यात पाठवून पत्रही दिले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी फिर्याद देण्यास आल्यावर गुन्हा दाखल करू असे सांगितले होत.
हा सर्व प्रकार झाल्यावर डॉ.थोरात यांनी आपले कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षा रक्षकांना फिर्याद देण्याच्या सुचना केल्या होत्या. शुक्रवारी सकाळीही त्यांनी पुन्हा सुचना केल्या. मात्र, सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत एकही कर्मचारी ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला नव्हता. यावरून शल्य चिकित्सकांच्या सुचनेकडून कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. आता यावर कारवाई होते की त्यांना ‘सहकार्य’ होते, हे वेळच ठरविणार आहे.
बीडमध्ये जिल्हा रूग्णालयाच्या छतावर आंबट चाळे करणाऱ्यांना अभय!
अगोदर पोलिसांचे अन् आता रूग्णालयाचे दुर्लक्ष
सुरूवातील पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने न पहात कारवाईकडे दुर्लक्ष केले. शल्य चिकित्सक डॉ.थोरात आक्रमक झाल्यावर अधीक्षक व अपर अधीक्षक कबाडे यांनी गुन्हा दाखलचे आदेश दिले. मात्र आता रूग्णालय प्रशासनाकडून फिर्याद देण्यास कोणीच पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.
शल्यचिकित्सकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी खुद्द डॉ.थोरात आक्रमक झाले होते. त्यांनी तात्काळ कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना आदेश दिले होते. मात्र, कर्मचारी व रक्षकांकडून त्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. अशा सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांमुळेच रूग्णालयात गैरप्रकार घडण्यास अभय मिळत आहे. तसेच कारभारही ढेपाळत आहे.
फिर्याद देण्याबाबत सूचना केल्या आहेत
रूग्णालयाच्या छतावर गैरप्रकार करणे चुकच आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी फिर्याद देण्याबाबत सुचना केलेल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार नाही.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड