शिरूरमधून शेवगावला चंदनाचा गाभा घेऊन जाणाऱ्या 'पुष्पा'ला बेड्या
By सोमनाथ खताळ | Published: July 15, 2023 03:11 PM2023-07-15T15:11:44+5:302023-07-15T15:11:52+5:30
एलसीबीची कारवाई : दुचाकीसह ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
बीड : शिरूर तालुक्यातील फुलसांगवी शिवारात चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा शेवगावला घेऊन जाणाऱ्या 'पुष्पा'ला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास फुलसांगवीजवळील मावसकर वस्तीजवळ स्थानिक गुन्हे शाखेने केली.
राम आप्पासाहेब गायकवाड (वय ४५, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. गायकवाड हा शेतातील चंदनाची झाडे शोधत असे. शेतकरी काम करून घराच्या दिशेने निघताच तो झाड तोडून त्यातील गाभा घेऊन धूम ठोकत असे. हीच माहिती उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना मिळाली. त्यांनी पथकासह गुरुवारी फुलसांगवी शिवारात सापळा लावला. गायकवाड दुचाकीवरून जात असतानाच त्याला पकडले. विचारणा केल्यावर त्याने पोत्यात शेतीचे साहित्य असल्याचे सांगून दिशाभूल केली; परंतु झडती घेतल्यानंतर त्यात नऊ किलो चंदनाचा गाभा सापडला. त्यानंतर पोलिसांनी गाभा व दुचाकी असा ४१ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, संजय जायभाय, रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजू पठाण, अर्जुन यादव, आदींनी केली.
पाच वर्षांपासून फरार आरोपीलाही बेड्या
बीड शहरासह केज व दिंद्रूड येथून दुचाकी चोरणारा सुमंत मुंडे (रा.वडवणी) हा पाच वर्षांपासून फरार होता. त्याला सुरुवातीला ताब्यात घेऊन जवळपास १५ पेक्षा जास्त दुचाकीही हस्तगत केल्या, परंतु अल्पवयीन असल्याने योग्य ती कारवाई करून त्याला सोडण्यात आले होते. तेव्हापासून तो फरार होता. आता सज्ञान झाला असून, वडवणीतून त्याला याच पथकाने बेड्या ठोकल्या. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे उपनिरीक्षक खटावकर यांनी सांगितले.