शहीद तौसिफ- जिल्ह्याचे भूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:06 AM2019-05-03T00:06:24+5:302019-05-03T00:08:00+5:30
गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात पाटोदा येथील पोलीस जवान शेख तौसिफ शेख आरेफ शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर पाटोदा येथे शोककळा पसरली. शुक्रवारी शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयासमोरील परिसरामध्ये दफनविधी होणार आहे.
पाटोदा : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात पाटोदा येथील पोलीस जवान शेख तौसिफ शेख आरेफ शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर पाटोदा येथे शोककळा पसरली. शुक्रवारी शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयासमोरील परिसरामध्ये दफनविधी होणार आहे. प्रशासकीय पातळीवर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही बातमी पाटोदाकरांना अधिकृतरित्या समजली. जिल्हा प्रशासनानेही दुजोरा दिला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत शहरामध्ये गटगटाने तौसिफच्या कार्य आणि शौर्याची चर्चा लोक करीत होते.
योगदान आणि बलिदानाची परंपरा
देशासाठी योगदान आणि बलिदान देण्याची पाटोदा तालुक्याची परंपरा राहिली आहे.
भारतीय सैन्य दलामध्ये या तालुक्यातील अनेक सुपुत्र आजही कार्यरत आहेत, तर अनेकांनी सेवा बजावली आहे.
सीमेवर शत्रूशी लढताना मायभूमीसाठी बलिदानही या तालुक्यातील सुपुत्रांनी दिले आहे.
आता पोलीस दलातील तौसिफच्या रुपाने शहिदांच्या या परंपरेत आणखी एक मानाचा आणि शौर्याचा तुरा रोवला गेला आहे.
बुधवारी सकाळी तौसिफचे आईशी बोलणे झाले होते. मेरी फिकीर मत करो. तुम अपनी सेहत का ख्याल रखा करो असा संवाद झाला होता. मात्र, काही तासांतच अघटित घडले.
तौसिफचे वडील हॉटेल कामगार म्हणून काम करतात. बुधवारपासून गुरुवारी सायंकाळपर्यंत तौसीफबाबतची माहिती त्यांच्या आईवडिलांना कळू दिली नव्हती.
अपघात झाला आहे, तौसीफ दवाखान्यात आहे. उपचार सुरु आहेत. दुआ से सब अच्छा होगा असे सांगत नातेवाईकांनी शे. आरेफ यांची मानसिकता तयार करीत गुरुवारी सायंकाळी सारे स्पष्ट केले.