७ दिवसांत ६४ टवाळखोरांना ‘शक्ती’ पथकाचा दणका...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:06 AM2019-12-29T00:06:17+5:302019-12-29T00:07:06+5:30
शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी शक्ती पथकाची स्थापना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली आहे. जिल्हाभरात ७ दिवसांमध्ये ६४ टवाळखोरांवर पथकाकडून कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
बीड : शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी शक्ती पथकाची स्थापना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली आहे. जिल्हाभरात ७ दिवसांमध्ये ६४ टवाळखोरांवर पथकाकडून कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
मागील काही दिवसांमध्ये महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले होते. खाजगी क्लासेस, शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये टवाळखोरांकडून दुचाकीवरुन घिरट्या घालणे, अश्लील शब्दात टिप्पणी करणे यासह विविध प्रकारे त्रास दिला जात होता. हा त्रास रोखण्यासाठी शक्ती पथकाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी जावून पथकाकडून टवाळखोरांवर कारवाया देखील करण्यात आल्या.
मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यातील एकूण २०९ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन छेडछाड प्रतिबंधासंबंधी जनजागृती पथकाच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी ५९ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील कारवाई करण्यात आली. तसेच ५ टवाळखोरांकडून १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आलेली आहे. अंबाजोगाईच्या पोलीस ठाण्यातील शक्ती पथकाला बसस्थानकातून एका महिलेचा फोन आल्याने, तेथे जाऊन महिलेच्या तक्रारीवरुन ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा झाल्या कारवाया
बीड तालुका - ९, धारुर - ३, अंबाजोगाई - ६, आष्टी - ८, परळी - ९, केज - ३, शिरुर - ०, गेवराई - ३, माजलगाव - ५