तिघांच्या त्रासाला कंटाळून जाळून घेतलेल्या शाम काळेचा अखेर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 07:25 PM2023-02-21T19:25:25+5:302023-02-21T19:26:12+5:30
कर्जाच्या रक्कमेतून तिघांनी त्रास दिल्याने घेतले होते पेटवून
केज (बीड) : केज येथे दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या शाम काळेची मृत्यूशी झुंज थांबली. सोमवारी रात्री 11वाजता स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई येथे त्यांचा मृत्यू झाला आहे .
परभणी जिल्ह्यातील मूळचे रहिवाशी असलेले शाम काळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात 20 वर्षांपासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत होते. 24 जानेवारी रोजी दादा मुंडे आणि सचिन सलगर व विजय जावळे यांच्याकडून त्याने 10 टक्के व्याजाने 3 लाख रुपये घेतले होते. त्या पैशाच्या बदल्यात शाम काळे याला ते तिघेजण त्याचे राहते घर त्यांच्या नावावर लिहून दे. अशी मागणी करीत होते. यामुळे शाम याने दि. 18 फेब्रुवारी रोजी त्यांना स्टॅम्प पेपरद्वारे स्वतःचे राहते घर नोटरी करून लिहून दिले होते.
दरम्यान दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांनी कॉलेजवर जाऊन शाम यास बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून केज-बीड महामार्गांवरील शिक्षक कॉलनी भागात आणले. नोटरीवर भागत नाही तुझ्या घराची रजिस्ट्री आमच्या नावाने करून दे म्हणून धमकी दिली. या त्रासाला कंटाळून व वैफल्यग्रस्त शाम याने पेट्रोल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले. या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी जखमी शाम काळे याचा उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या समक्ष स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जळीत वार्डात मृत्यूपूर्व जबाब नोंदवून घेतला होता.
या जवाबा वरून केज पोलीस ठाण्यात दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे ( तिघे रा. कळंब ) यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा दं वि 365, 504, 506,व 34 आणि महाराष्ट्र सावकारकी अधिनियम 2014 चे कलम 39 व 45 नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी कळंब जि उस्मानाबाद पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. शाम काळे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पंचनामा करून उत्तरीय तपासणी करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.