साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ असलेले बीडचे शनि देवस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:30 PM2019-01-05T12:30:02+5:302019-01-05T12:34:52+5:30
विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची अख्यायिका.
बीड : साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ असलेल्या बीड येथील शनि महाराजांच्या दर्शनासाठी शनि अमावस्येनिमित्त गर्दी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्यामुळे मंदिर परिसराला हळुहळू जत्रेचे स्वरुप येऊ लागले आहे.
उज्जैन, नांदगाव (जि. नाशिक), राक्षसभुवन हे तीन आणि बीड येथील शनि देवस्थान अर्धे असे साडेतीन पीठ आहेत. बीड येथील हे शनि देवस्थान जवळपास सध्या २ एकरच्या जागेत वसलेले आहे. बीड शहराला तसा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा. शहरातील कनकालेश्वर, शहेंशाहवली दर्गा, मन्सूरशहा दर्गा, किल्ला, खंडोबा मंदिर, दीपमाळ, जटाशंकर मंदिर, खंडेश्वरी मंदिर, शिदोडचे महालक्ष्मी मंदिर, खजाना बावडी आदी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे हे बीड शहर परिसरातील.
विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची अख्यायिका. १९५२ साली निजामशाहीत या मंदिराला सनद प्राप्त झाली. कोल्हेर (ता.गेवराई) येथे ४० एकर आणि शिदोड येथे ३६ एकर जमीन देवस्थानच्या नावावर आहे. पैकी शिदोडच्या जमिनीचा वाद चालू आहे. ऐतिहासिक काळात शहरातून वाहणाऱ्या बिंदूसरा नदीचे पात्र या शनि देवस्थानपर्यंत होते. पुढे पर्जन्यमान घटत गेले, तशी मंदिर आणि बिंदूसरा पात्राच्या मध्ये वस्ती वाढली. एक जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अतिक्रमणामुळे ४ एकर जागा असलेले हे मंदिर १८०० स्क्वेअर फूट जागेतच मर्यादित होते. आता पैकी २ एकर जागा मोकळी झाली असून, उर्वरित जागेचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. मंदिरात दोन विहिरीपैकी एक पुरातन बारव आहे. या दोन विहिरींचे पाणी पिण्यायोग्य असून, कधीही आटत नाही. दुष्काळातही या विहिरीतून पाणीपुरवठा सुरू होता.
मंदिराच्या विकासासाठी जागा असूनही अतिक्रमणात अडकली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू असून, भाविकांचेही योगदान मिळत आहे. मंदिराच्या जागेचा आणि जमिनीचा वाद मिटला तर देवस्थानच्या विकासासाठी फायदा होईल, असे देवस्थानचे प्रशासक रामनाथ खोड यांनी सांगितले.