शंतनू वाईट काम करू शकत नाही; आई हेमलता यांनी व्यक्त केला मुलाबद्दल विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 06:59 PM2021-02-17T18:59:44+5:302021-02-17T19:05:53+5:30
Greta Thunberg tool kit case दोन-तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी आमच्या घरी येऊन शंतनूसंदर्भात चौकशी केली
बीड : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लावल्याचा आरोप करीत दिल्ली पोलिसांनी बीडमधील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू शिवलाल मुळूक याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्या घरच्या मंडळींचीदेखील चौकशी केली. या वेळी माध्यमांशी बोलताना शंतनू याची आई हेमलता मुळूक यांनी म्हटले की, ‘शंतनू कुठलेही वाईट काम करूच शकत नाही याचा मला विश्वास आहे. मीदेखील एक शेतकऱ्याची मुलगी आहे, म्हणून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तर असणारच; त्यामुळे शंतनूवर केलेल्या आरोपांत तथ्य नाही.’
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या दिल्ली येथील आंदोलनादरम्यान प्रजासत्ताकदिनी दिल्लीत हिंसक प्रकार घडला. आंदोलनादरम्यान ‘टूलकिट’चे प्रकरण समोर आले. यामध्ये बीड येथील शंतनू शिवलाल मुळूक या तरुणावरही दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांचे एक पथक मागील चार-पाच दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून होते. या संदर्भात बीड येथील पोलिसांना काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.
मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी आमच्या घरी येऊन शंतनूसंदर्भात चौकशी केली. त्यानंतरच आम्हाला कळले, काहीतरी झालेले आहे. मात्र, शंतनू चुकीचे काम करणार नाही, असा विश्वास आहे, असे शंतनूची आई हेमलता मुळूक यांनी सांगितले. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल बीड येथील शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना केंद्र सरकार जाणूनबुजून त्रास देत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तसेच शेतकऱ्यांना पाठिंबा दिला म्हणून अशी सूडबुद्धीने कारवाई केली जात असेल, तर जिल्ह्यात व राज्यात आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील त्यांनी दिला.