शरद पवार आज बीडमध्ये, उद्या बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:31 AM2019-09-17T00:31:51+5:302019-09-17T00:32:08+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार मंगळवारपासून दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार मंगळवारपासून दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ रोजी त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.
मंगळवारी खा. शरद पवार यांचा बीडमध्ये मुक्काम असून त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे ही उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसाच्या दौ-यात खा. पवार हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कॅनॉल रोडवरील रामकृष्ण लॉन्स येथे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, संदीप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, अॅड. उषा दराडे, सुनील धांडे, विजयसिंह पंडित यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिली.