'तुतारी' हाती घेण्याच्या चर्चेतच उमेदवारी न मिळाल्याचा धक्का; आडसकर, मेटे, मस्केंची बंडखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 07:32 PM2024-11-01T19:32:31+5:302024-11-01T19:34:59+5:30
शरद पवारांनी ऐनवेळी भाकरी फिरवली; आता ते अर्ज ठेवतात की मागे घेतात, हे ४ नोव्हेंबरला समजणार आहे. परंतु सध्या तरी त्यांच्या प्रवेशाची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
बीड : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने भाजपचे रमेश आडसकर, राजेंद्र मस्के आणि ‘शिवसंग्राम’च्या डॉ. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. परंतु ऐनवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवत दुसऱ्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे या तिघांचीही निवडणूक मैदानात उतरण्याआधीच विकेट गेली. आता या तिघांनीही बंडखोरी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता ते अर्ज ठेवतात की मागे घेतात, हे ४ नोव्हेंबरला समजणार आहे. परंतु सध्या तरी त्यांच्या प्रवेशाची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
मागील काही महिन्यांत राज्यात राजकीय घडामोडी झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील समीकरणेही बदलली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विरोधात लढलेलेदेखील आता मांडीला मांडी लावून बसत होते. परंतु आता तेच नेते उमेदवारीसाठी पक्षाकडे हट्ट धरत होते. प्रत्येक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. प्रत्येक जण सहा महिन्यांपासून तयारीला लागला होता. परंतु ऐनवेळी मात्र, उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काही नेत्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ‘शिवसंग्राम’च्या डॉ. ज्याेती मेटे, माजलगावातून इच्छुक असलेले भाजपचे रमेश आडसकर आणि बीडमधून राजेंद्र मस्के यांचा समावेश होता. डॉ. मेटे यांचे नाव लोकसभेतही चर्चेत होते; परंतु ऐनवेळी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आडसकर आणि मस्के मात्र, आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने शरद पवार गटात गेले होते. परंतु त्यांना पक्षाने नाकारत दुसऱ्यालाच उमेदवारी दिली. त्यामुळे आता या तिघांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राजेंद्र मस्केंचे नाव आघाडीवर
बीड मतदारसंघातून जरांगे फॅक्टर चालेल, या आशेने मराठा चेहरा म्हणून राजेंद्र मस्के यांनाच उमेदवारी मिळेल, असे संकेत होते. यासंदर्भात विचारणाही झाली होती; परंतु शेवटी संदीप क्षीरसागर यांचेच नाव जाहीर केले. त्यामुळे मस्के नाराज झाले. आता त्यांनी बीड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यावतीने हा अर्ज असल्याचे सांगण्यात आले. परंतु जरी अर्ज मागे घेतला तरी मस्के हे संदीप क्षीरसागर यांचे काम करणार का? हा प्रश्न आहे. कारण, काही दिवसांपूर्वी याच मस्केंनी क्षीरसागर मुक्त बीड करण्याचे आवाहन केले होते.