लाभ दिलेल्या रुग्णसंख्येचा दावा शेटेंच्या अंगलट ?; २०१५ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातील प्रकरणांच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 08:11 PM2020-11-26T20:11:43+5:302020-11-26T20:13:11+5:30
२०१५ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आ. प्रकाश सोळंके यांची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आ.प्रकाश सोळंकेंची मागणी
माजलगाव : मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात मार्च 2015 ते ऑक्टोंबर 2019 या कालावधीत रूग्णांना वितरीत करण्यात आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आ. प्रकाश सोळंके यांनी केला आहे. तसेच याची चौकशी प्रधान सचिव आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांनी एका पत्राव्दारे केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी जाहिरपणे प्रसार माध्यमात मार्च 2015 ते ऑक्टोंबर 2019 या कालावधीत 21 लाख रूग्णांना तब्बल 1500 कोटी रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन वितरीत केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वेबसाईटवर पाच वर्षात सुमारे 54 हजार रूग्णांवर केवळ 526 कोटी रूपयांची मदत वितरीत केली गेल्याचे नमुद केलेले आहे. या सदंर्भात मागील पाच वर्षात किती रूग्णांना ? किती रूपये ? मदत वितरीत केली गेली, याची सखोल चौकशी आरोग्य प्रधान सचिव आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात यावी. यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आ. सोळंकेकडे सांगलीच्या रूग्णसेवकांने मांडले होते गार्हाणे
मिरज जिल्हा सांगली येथील रूग्णसेवक स्वरूप काकडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातील गैरकारभार विषयी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे दि.10 नोव्हेंबर 2020 रोजी लेखी स्वरूपात तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, अनेक मृत रूग्णांच्या नांवे पैसे वितरीत केले गेले आहेत. यामुळे तालुका निहाय व हॉस्पिटल निहाय किती मदत वितरीत केली गेली याची चौकशी व्हावी. या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी.
रूग्णांना लाभ दिल्याचा दावा शेटेंच्या अंगलट !
दि.1 जानेवारी 2015 ते दि.31 मार्च 2019 दरम्यान एकूण 85 हजार 689 रूग्णांनी अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज केले होते. त्यातील 53 हजार 762 रूग्णांना अर्थसहाय्यांचा लाभ मिळाला. या लाभ मिळालेल्या रूग्णांना एकूण 526 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य झाले असल्याची माहिती स्वरूप काकडे यांनी निवेदनात दिलेली आहे. परंतू शेटें यांच्याकडून 21 लाख रूग्णांना 1500 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य दावा केला होता. हाच दावा त्यांच्या कक्ष विभागातील अनागोंदी समोर आणणारा ठरत असल्याची चर्चा आहे.
प्रधान सचिवच काय ? तर सिबीआय मार्फत चौकशी करा : शेटे
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामार्फंत खर्या अर्थाने गरजू रूग्णांना अर्थसहाय्य झाले. राज्यात सर्वाधिक अर्थसहाय्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी कक्षअधिकारी असतांना मिळालेले आहे. आ.प्रकाश सोळंकेंची मागणी ही निरर्थक आहे. त्यांनी चौकशी प्रधान सचिवामार्फतच नव्हे तर सिबीआय, इंटरपोल मार्फत करावी.
- ओमप्रकाश शेटे, माजी कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी