शेतकऱ्यांचा ‘शिमगा’, खंडित वीज पुरवठा झाला सुरळीत;पण शॉर्टसर्किटने १५० एकर उसाची होळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:50 PM2022-03-17T12:50:35+5:302022-03-17T12:51:26+5:30

३० ते ४० शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी

'Shimga'; Interrupted power supply; But short circuit made 150 acres of sugarcane Holi! | शेतकऱ्यांचा ‘शिमगा’, खंडित वीज पुरवठा झाला सुरळीत;पण शॉर्टसर्किटने १५० एकर उसाची होळी!

शेतकऱ्यांचा ‘शिमगा’, खंडित वीज पुरवठा झाला सुरळीत;पण शॉर्टसर्किटने १५० एकर उसाची होळी!

Next

केज/बनसारोळा : केज तालुक्यातील सौंदाना गावच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा बुधवारी पूर्ववत करण्यात आला खरा; परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्किट) उडालेल्या ठिणगीने तब्बल १५० एकरांवरील उसाची अक्षरश: होळी झाली. या अग्नितांडवात ३० ते ४० शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे गावकऱ्यांनी महावितरणच्या नावाने ‘शिमगा’ केला.

सौंदाना गावातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा थकीत वीज बिलापोटी खंडित करण्यात आला होता. काही शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यानंतर बुधवारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन (शॉर्टसर्किट) ठिणग्या उडाल्या. उसाच्या फडातील पाचटीने पेट घेतल्याने फडच्या फड वाऱ्याच्या वेगाने एकामागून एक पेटत गेले. वाऱ्याचा वेगच इतका होता की, सौंदाना शिवारात बघताबघता आगडोंब उसळला. केजहून अग्निशामक दलाची गाडी मागविण्यापूर्वीच १५० एकरांवरील उसाची राखरांगोळी झाली. आगीने रौद्र रूप धारण करीत सौंदाना-बनसारोळा रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूचा ऊस खाक झाला.

कारखान्यांनी ऊसतोड वेळेवर न केल्याने नुकसान
या आगीत ३० ते ४० शेतकऱ्यांचा दीडशे एकर ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांनी ऊसतोड वेळेवर न केल्याने, तसेच महावितरणने वीज तारा व्यवस्थित न बसविल्याने हे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्वकाही संपले...
या आगीत जगन्नाथ नांदुरे, रमेश भिसे, रुक्मिण भिसे, गणेश भिसे, स्वाती भिसे, राजामती भिसे, प्रदीप भिसे, नरसू भिसे, सूर्यकांत नांदुरे, अशोक नांदुरे, रूपाबाई दहिरे, शहाजी भिसे, महादेव चव्हाण, आदी ३० ते ४० शेतकऱ्यांचा १५० एकर ऊस आगीत जळून खाक झाला. उसासोबत ठिबक संचही जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Web Title: 'Shimga'; Interrupted power supply; But short circuit made 150 acres of sugarcane Holi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.