पावसाने झोडपल्याने शिमला मिरची फेकली बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:37 AM2021-09-21T04:37:20+5:302021-09-21T04:37:20+5:30
नितीन कांबळे/ लोकमत न्यूज नेटवर्क कडा : पावसाने झोडपल्याने तब्बल २५ टन शिमला मिरची बांधावर फेकून देण्याची वेळ आष्टी ...
नितीन कांबळे/
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पावसाने झोडपल्याने तब्बल २५ टन शिमला मिरची बांधावर फेकून देण्याची वेळ आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील एका शेतकऱ्यावर आली आहे. या शेतकऱ्याचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील अरुण दादासाहेब पडोळे या शेतकऱ्याने शिमला मिरचीचे १६ हजार रुपयांची रोपे एक एकर शेतीमध्ये लावले. सुरुवातीला पाऊस वेळेवर झाल्याने ही रोपे बहरून आली. मागील १५ दिवसांपूर्वी याच भागात पावसाने थैमान घातले. ढगाळ वातावरणामुळे या रोपांना कीटकनाशके, फवारणी, खुरपणी, बांधणी यासाठी जवळपास एक ते दीड लाख रुपयांचा खर्च झाला. सुरुवातीला पाऊस जेमतेम असल्याने एक ते दीड टन शिमला मिरची वाशी या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यात आली. भाव नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागले. मध्यंतरी या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मिरची लागवड केलेल्या शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले. साधारणपणे एक एकरमध्ये २० ते २५ टन सिमला मिरचीचे उत्पादन होते. यामधून साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पावसामुळे शेतकऱ्याचे हे स्वप्न धुळीस मिळाले. झालेला खर्चदेखील न निघता लगडलेली सर्व शिमला मिरची लाल होऊन खराब झाल्यामुळे तोडून बांधावर फेकून देण्यापलीकडे शेतकऱ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
....
पावसामुळे सिमला मिरचीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्यामुळे शेती कशी करावी, असा सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडला आहे. यावर झालेला खर्च कसा आणि कुठून काढावा? निसर्गही हातातोंडातले काढून घेतोय. नेमकं कळत नाही. नशीब खराब की नियती साथ देत नाही हेच कळत नाही. असे हताश झालेले शेतकरी अरुण पडोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
...