शिरूर तालुका एकाच रात्रीत जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:38+5:302021-09-06T04:37:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्यात शनिवारी एकाच रात्रीत झालेल्या पावसामुळे सिंदफना मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागला. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यात शनिवारी एकाच रात्रीत झालेल्या पावसामुळे सिंदफना मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागला. यामुळे रविवारी सकाळी सिंदफना नदीला महापूर आला आहे. सिंदफनेचे रौद्ररूप पाहता, ही धोक्याची नांदी ठरू शकते. यामुळे पोलीस व तहसीलदार नदीकाठच्या गावांना भेट देऊन सावधानतेचा इशारा देत आहेत. सिंदफनेला आलेला पूर पाहण्यासाठी अबाल-वृध्दांनी सकाळीच गर्दी केली होती.
जवळपास १९८३ पासून आजपर्यंत रेकार्ड ब्रेक करणारा पाऊस शनिवारी रात्री पडला. सिंदफना प्रकल्प यावर्षी भरणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच एकाच रात्रीत पावसाने किमया साधली. पाणी टंचाईच्या प्रश्नाला पूर्णविराम दिला. श्रावणात समारोपाला सिंदफनेच्या पाण्याने सिध्देश्वराच्या पायरीला स्पर्श केला.
गेल्या सहा दिवसांपासून सिध्देश्वर मंदिरात पारंपरिक ओम नमःशिवायऽऽचा नामजप सुरू आहे. श्रावण महिन्याचा समारोप होत असतानाच सिंदफना वाहू लागली. पूर पाहण्यासाठी मंदिरावर नागरिकांनी गर्दी केली होती. बाजारओटे संपूर्ण पाण्यात गेले होते. हाॅटेल लाईनला नदीच्या पाण्याने वेढा टाकला होता.
...
नदीकाठच्या लोकांना सूचना
तहसीलदार श्रीराम बेंडे हे पहाटेपासूनच गस्त घालत होते. कालिका मंदिरातील स्पिकरवरून, नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करीत होते. पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने व सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार हे देखील पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
...
मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज
जीवित हानी नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतीपिके पाण्यात गेली आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सविस्तर पाहणी अहवाल संकलित करण्यासाठी सूचना दिल्या असल्याचे तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी सांगितले.
..
सर्व धरणे भरली
शिरूर तालुक्यातील सिंदफना, घाटशिळा, फुलसांगवी, पिंपळवंडी येथील तलाव ओसंडून वाहू लागले आहेत, तर उथळा मध्यम प्रकल्पही भरण्याच्या मार्गावर आहे. यामुळे तालुका पाणीटंचाईमुक्त बनला आहे.
...
050921\1327-img-20210905-wa0001.jpg
सिंधफना नदीला आलेला पूर.