शिरूरच्या गट शिक्षण कार्यालयाचे रूपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:48+5:302021-02-10T04:33:48+5:30
शिरूर कासार : येथील गट शिक्षण कार्यालयाने माझे सुंदर कार्यालय या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या ...
शिरूर कासार : येथील गट शिक्षण कार्यालयाने माझे सुंदर कार्यालय या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लोकवाट्यातून रंगरंगोटी करून कार्यालयाचे रूपच पालटून टाकले. त्याचबरोबर अंतर्गत आणि परिसर स्वच्छता करून कार्यालयाला चैतन्य प्राप्त करून दिले. कार्यालयीन कामकाजात अभिलेखे वर्गीकरण करून स्वतंत्र गठ्ठे बांधणीदेखील करण्यात आली.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारती मागेच गट शिक्षण कार्यालय असून या इमारतीचा रंग उडाला होता. शिवाय परिसर झाडेझुडूपे, गवत काडीने व्यापला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गट शिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी सुंदर माझे कार्यालय ही संकल्पना आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या गळी उतरवली. लोकवाट्यातून इमारतीला रंग दिला. त्याचबरोबर परिसर स्वच्छता करून निर्मळ केला. झाडेझुडपे तोडून गवत काडी झाडून काढली. हे सर्व करताना अंतर्गत स्वच्छतेलाही प्राधान्य दिले व दैनंदिन कामकाजाचे अभिलेखे वर्गीकरण करून कपड्यात गठ्ठे बांधल्याने कार्यालयाला हरवलेले रूप पुन्हा प्राप्त झाले आहे.
आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्याच न्यायाने कार्यालयसुद्धा स्वच्छ असावे ही संकल्पना राबवली. त्याला सहकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आता माझे कार्यालय सुंदर दिसू लागल्याचे समाधान वाटत असल्याचे गट शिक्षण अधिकारी जमीर शेख म्हणाले. यापुढेही स्वच्छतेत सातत्य ठेवण्याचा संकल्प सर्वांनी मिळून केला असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो : माझे कार्यालय संकल्पनेतून गट शिक्षण कार्यालयाचा झाला कायापालट. अभिलेखे वर्गीकरण करून गठ्ठे बांधतांना विठ्ठल खेडकर ,राम भोंडवे यांचेसह मानकर (शिपाई ).