बीड शहरातील पथदिव्यांसाठी शिवसंग्रामचे कंदील आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:18+5:302021-07-11T04:23:18+5:30
बीड : शहरातील पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. यासंदर्भात नगर परिषदेकडे वेळोवेळी निवेदन देऊनदेखील नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ...
बीड : शहरातील पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहेत. यासंदर्भात नगर परिषदेकडे वेळोवेळी निवेदन देऊनदेखील नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे शिवसंग्रामच्या वतीने दत्ताजी गायकवाड यांनी गेल्या तीन दिवस कंदील लावून धरणे आंदोलन केले. दोन-तीन दिवसांमध्ये संपूर्ण शहरातील पथदिवे चालू करू, असे लिखित आश्वासन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी यावेळी दिले.
आमदार विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम बीड शहरातील नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन सातत्याने आंदोलन करत आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्क प्रश्नांवर शिवसंग्राम एकाकी लढा देत आलेला आहे. या अगोदरही दत्ताजी गायकवाड यांनी रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी पेठबीड भागामध्ये आंदोलन केले होते. शहरातील अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसंग्रामच्या वतीने महिलांचा प्रचंड मोर्चा नगरपालिकेवर धडकला होता. शहरांमधील राहणाऱ्या जनतेला ज्या हक्काच्या सुविधा आहेत त्या मिळाव्यात म्हणून शिवसंग्रामच्या वतीने वेळोवेळी आंदोलन उपोषण करण्यात येत आहे. तरीदेखील प्रशासन व नगराध्यक्ष जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. येणाऱ्या काळामध्ये जर या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही, तर नगरपालिकेच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसंग्रामच्या वतीने देण्यात येत आहे.
शहरातील पथदिव्याच्या संदर्भात धरणे आंदोलनामध्ये शाहूनगर तसेच बीड शहरातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसंग्रामचे रामहरी मेटे, अनिल घुमरे, सुहास पाटील, शेषराव तांबे, सुनील शिंदे, राहुल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसंग्रामचे नेते, मच्छिंद्र कुटे, मनोज जधव, प्रशांत डोरले, प्रकाश जाधव, अनिकेत देशपांडे, अझजर भाई, सुरेश बावळे, शेख लालाभाई, शैलेश सुरवसे, सुनील धायजे, हरिश्चंद्र ठोसर, सुरज बहिर, राजू पठाण आदी उपस्थित होते. तसेच शाहूनगरमधील नागरिकांनीदेखील दत्ता गायकवाड यांनी उभारलेल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला होता.
100721\10bed_15_10072021_14.jpg
शिवसंग्रामचे कंदील आंदोलन