शिवसेना टार्गेट होतेय; उपजिल्हाप्रमुखाला मारहाण, तर जिल्हाप्रमुखाला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:03+5:302021-09-03T04:35:03+5:30
सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात सध्या शिवसेनेला विरोधकांकडून टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुखावर ...
सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यात सध्या शिवसेनेला विरोधकांकडून टार्गेट केले जात असल्याचे दिसत आहे. चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुखावर जिवघेणा हल्ला केला. हे प्रकरण ताजे असतानाच जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना फोनवरून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. शिवसेनेचे ‘वाघ’ शांत झाल्यानेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षांतर्गत वाद तर सुरूच आहेत. परंतु आता विरोधकही त्यांना टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. आठवडाभरात जिल्ह्यात अनेक घडामोडी शिवसेनेत झाल्या आहेत. रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांविरोधात रोष व्यक्त करत ते केवळ पैसे कमवायलेत, असा गंभीर आरोप केला होता. तसेच उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांच्या नातेवाइकांवर हद्दपारीची कारवाई झाली होती. यात आपल्याला कोणीच सहकार्य केले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जगताप यांनी जाहीरपणे सांगितल्यावर दोन दिवसांनीच त्यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. याचा रोष जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेविरोधात होता. परंतु हल्लेखोर राष्ट्रवादीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने खांडे सुखरूप बाहेर पडले. परंतु शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने राज्यभरात चर्चा झाली.
पिंपळनेरच्या युवकाकडून जिल्हाप्रमुखाला शिवीगाळ
पिंपळनेर येथील युवकाचा मित्र जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्याकडे कामाला आहे. त्याचे १५ हजार रुपये जाधव यांच्याकडे बाकी आहेत. त्याची आई रुग्णालयात उपचार घेत असून, पैशांची कमी असल्याने त्याने जाधव यांच्याकडे मागणी केली. परंतु ते दिले नाहीत. पैसे का देत नाही, असा आरोप करीत या युवकाने जाधव यांना सुरुवातीला अरेरावी व नंतर शिवीगाळ करायला सुरुवात केली. समोरून जाधव यांनीही शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. परंतु या प्रकरणात अद्यापही कोठेच नोंद नसल्याचे सांगण्यात आले. शिवीगाळीची सुरुवात ही युवकानेच केल्याचेही क्लिपमधून समजते. शिवसेनेत जिल्हाप्रमुखाला उच्च स्थान असते. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीला असे कोणीही शिवीगाळ करण्याची हिंमत करत असेल तर ही विचार करायला लावणी गोष्ट आहे, हे निश्चित.
--
मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. शिवीगाळ करणाऱ्या मुलाला मी ओळखतही नाही. त्याने वेगवेगळ्या क्रमांकावरून वारंवार फोन केला. मी शांतच होतो. एवढ्यात त्याने शिवीगाळ केली. मला भडकावण्याचा त्याचा उद्देश असावा. हे प्रकरण नॉर्मल आहे, कुठे नादी लागत बसावे, म्हणून मी तक्रार दिलेली नाही.
आप्पासाहेब जाधव, जिल्हाप्रमुख, शिवसेना
020921\02_2_bed_8_02092021_14.jpg
आप्पासाहेब जाधव, जिल्हा प्रमुख शिवसेना